
अमेरिकेच्या हवाई दलाच्या ‘क्लाऊड वन’ या सिस्टममध्ये हॅकर्सनी घुसखोरी करत सायबर हल्ला केला. या हल्ल्यामुळे अमेरिकेच्या लष्करी कारवाया, अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती आणि रसद पुरवठय़ाशी संबंधित संवेदनशील माहिती धोक्यात आली आहे.
‘क्लाऊड वन’ सिस्टम अद्ययावत करण्याचे काम सुरू असतानाच ही घुसखोरी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे ‘क्लाऊड वन’च्या कामकाजात अडथळे निर्माण झाले आहेत. मात्र, या सायबर हल्ल्यामागे कोण आहे, कोणती माहिती चोरली गेली? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. हवाई दलाची माहिती, प्रणाली आणि मोहिमांची क्षमता सुरक्षित ठेवण्यासाठी सातत्याने पावले उचलली जात असल्याचेही हवाई दलाने म्हटले. हवाई संरक्षण रडार आणि इतर डेटा फीड्स एकत्र करणारी ‘क्लाऊड-बेस्ड कमांड अँड पंट्रोल’ प्रणालीसह जगातील 200 हून अधिक अमेरिकी हवाई तळांवरील बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचा मागोवा घेणाऱ्या यंत्रणेचा यात समावेश आहे.
‘क्लाऊड वन’ काय आहे?
‘क्लाऊड वन’ ही अमेरिकी हवाई दलाच्या माहिती तंत्रज्ञान गरजांसाठी उभारलेली प्रमुख केंद्रीय प्रणाली आहे. मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, ऑरॅकल आणि अल्फाबेट या चार प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांच्या क्लाउड सेवा या व्यासपीठावर एकत्र आणल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या नोंदी आणि वेतनापासून ते रसद पुरवठा आणि विमानांच्या देखभालीपर्यंत अनेक सेवा या प्रणालीद्वारे चालवल्या जातात.

























































