वेष बदलून चिमुरड्यांवर बलात्कार, बहुरुप्याला पकडण्याचं पोलिसांसमोर आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

लहान मुलींवर बलात्कार केल्यानंतर नवं रुप धारण करणाऱ्या बहुरुप्या बलात्काऱ्याला पकडण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. या बहुरुप्याचे वेगवेगळ्या वेषातील फोटो ठाणे आणि नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये उपलब्ध आहेत. मात्र हा बहुरुप्या दरवेळी नवं रुप धारण करत असल्यानं आरोपी नेमका कसा दिसतो हे पोलिसांना कळू शकत नाहीये. या बहुरुप्याने १० ते १२ लहान मुलींवर बलात्कार केल्याचं उघड झालंय.

हा बहुरुप्या बलात्कार करण्याआधी लहान मुलींवर बारीक नजर ठेऊन असतो. तिथे आसपास निर्जनस्थळ आहे का याचीही तो पाहणी करतो त्यानंतर तो या मुलींना पळवून नेत त्यांच्यावर अत्याचार करतो. गेल्या एक वर्षापासून हा बलात्कारी मोकाट आहे. लहान मुली घाबरल्याने त्या या बहुरुप्याचं नीट वर्णन करू शकत नाही, शिवाय तो सतत वेश बदलत असल्याने त्याची ओळख पटवणं आणखी अवघड बनलंय. कधी पार्सलबॉय म्हणून तर कधी नातेवाईकाचा मित्र असल्याचं सांगत हा बलात्कारी मुलींना पळवून नेतो. या बहुरुप्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आत्तापर्यंत किमान एक हजार सीसीटीव्ही दृश्ये तपासली आहेत. ही दृश्ये तपासल्यानंतर पोलिसांच्या हाती बलात्काऱ्याचा एक फोटो लागला आहे.

हा बलात्कारी मुलींचे पालक घरी नसतानाच या मुलींना पळवून नेतो. त्यासाठी तो आधी मुलीचे पालक दिवसभर काय करतात यावर लक्ष ठेवून असतो. गोड-गोड बोलणाऱ्या या बलात्काऱ्यावर कोणाला संशयही येत नाही. त्याचा फायदा घेत हा मुलींना पळवून नेतो. या बलात्काऱ्याने रबाळे, खारघर, नालासोपारा, वाशी या सारख्या भागांमध्ये चिमुरड्यांवर बलात्कार केले आहेत.