अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा राज्यांना अधिकार असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जाहीर केला आहे. या निकालानंतर सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी मध्यप्रदेशातील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सरन्यायाधीशांना धमकी देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
मध्यप्रदेशच्या बैतुल गंज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
पंकज अतुलकर नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर हिंदीमध्ये पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने आरक्षणासंबंधी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालावर नाराजी व्यक्त करतानाच सरन्यायाधीशांना धमकी दिली आहे. अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय हा राज्यघटनेने दिलेल्या हक्कांचे उल्लंघन करणारा आहे. अनुसूचित जाती-जमातीतील लोकांना गुलाम बनवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांना जीवे मारण्यात येईल, अशी धमकी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.