नोकरीसाठी अकोल्यात आलेल्या तरुणीची मित्राकडून हत्या, आरोपी फरार

नोकरीसाठी दिल्लीहून अकोला येथे आलेल्या तरुणीची तिच्या मित्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर आरोपी मित्र फरार आहे. घटनेची माहिती मिळताच अकोला पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. शांतिप्रिया प्रशांत कश्यप असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर कुणाल उर्फ सनी शृंगारे असे आरोपीचे नाव आहे.

शांतिप्रिया ही अनेक वर्षांपासून दिल्लीत राहत होती. काही दिवसांपूर्वी तिची मूळचा यवतमाळचा असलेल्या कुणालसोबत भेट झाली होती. कुणालने तिला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने अकोल्यात बोलावले. त्यानुसार 21 जुलै रोजी शांतिप्रिया अकोल्यातील मूर्तिजापूर येथे आली. त्यानंतर कुणाल तिला एका बारमध्ये नोकरीसाठी घेऊन गेला. मात्र बार मालकाने काम द्यायला नकार दिल्याने दोघे तेथून निघून गेले. यानंतर दोघांनी मूर्तिजापूर येथील प्रतिकनगरमध्ये एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

दोन दिवस सर्व ठीक चालू होते. मात्र कुणालला दारुचे व्यसन असल्याने दोघांमध्ये भांडणे होऊ लागले. बुधवारी रात्रीही दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर कुणालने शांतिप्रियाच्या डोक्यात वार करुन तिची हत्या केली. घटनेनंतर कुणाल फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.