
पुणे शहर परिसरात चारचाकी गाड्यांचे सायलेन्सर चोरुन धुमाकुळ घालणा-या टोळीला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली. हडपसर येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून चोरीचे 16 सायलेन्सर जप्त करण्यात आले असून 15 गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरिफ सलीम शेख (वय 19), हुसेन बढेसाहब शेख (वय 23), साहील वसीम शेख (वय 19), सहजाद अक्रम खान (वय 19), रहिम खलील शेख (वय 24), सोहेल सलीम खान (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने हडपसर भागातील म्हाडा सोसायटीच्या परिसरात ही कारवाई केली. शहरात मागील काही दिवसात सायलेन्सर चोरीच्या घटना वाढल्या होत्या.
यातच हडपसर भागात सायलेन्सर चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. या पार्शवभूमीवर गुन्हे शाखा युनिट पाचचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान सायलेन्सर चोरणारे संशयित हे म्हाडा सोसायटीच्या परिसरात असल्याची माहिती अंमलदार अकबर शेख, प्रताप गायकवाड यांना मिळाली होती. यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी शहरातील हडपसर, शेवाळवाडी, फुरसुंगी, देवाची ऊरुळी, मुंढवा, मांजरी या भागात गाड्यांचे सायलेन्सर चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून ३ लाख २० हजार रुपये किमतीचे १६ सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, अंमलदार रमेश साबळे, आश्रुबा मोराळे, राजस शेख, शशिकांत नाळे, विनोद शिवले, स्वाती गावडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे.
परराज्यात धातूमिश्रीत मातीची विक्री
गाडीचे सायलेन्सर चोरल्यानंतर आरोपी हे त्या सायलेन्सरमधील कन्व्हर्टरमध्ये असलेली मौल्यवान प्लॅटिनम धातूमिश्रीत माती काढून ती परराज्यातील आरोपींना विकत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.




























































