
नंबर वन होण्यासाठी पालिकेने तयार केला मास्टर प्लॅन
देशातील स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत गेल्या आठ वर्षांपासून मुंबईचा समावेश होत नसल्यामुळे पालिका आता खडबडून जागी झाली असून मुंबईला ‘स्वच्छ-सुंदर’ बनवण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’नुसार कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये कचऱयाचे 100 टक्के वर्गीकरण, ‘झीरो गार्बेज’ मोहीम, व्यापक जनजागृती आणि स्वच्छतेचे नियम मोडणाऱयांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
‘स्वच्छ सर्वेक्षण मोहीम 2023’मध्ये नवी मुंबई देशात तिसरे तर राज्यात पहिले शहर ठरले आहे. 2015 मध्ये मुंबईचा देशातील स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक आला होता, मात्र आशियातील सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेचा 2015 पासून पहिल्या तीनमध्ये समावेश झालेला नाही. एकीकडे स्वच्छतेच्या उपक्रमासाठी अर्थसंकल्पात सुमारे पाच हजार कोटींची तरतूद केली जात असताना देशपातळीवरील स्पर्धेत नंबर येत नसल्यामुळे पालिका आता कामाला लागली आहे. यामध्ये सोसाटय़ांना आता पुन्हा कचरा वर्गीकरण करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. कचरा वर्गीकरण करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृतीसोबत कारवाई करण्याचाही विचार सुरू आहे.
डेब्रिज टाकणाऱया 2136 ठिकाणी कारवाई
मुंबईत मोठय़ा प्रमाणावर बांधकाम सुरू असून रस्त्यावर, उघडयावर डेब्रिज टाकले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रस्त्यांवर डेब्रिज टाकणाऱया डंपरवर सीसीटीव्ही कॅमेऱयाच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येते आहे. शिवाय ‘डेब्रिज ऑन कॉल’ मोहिमेत 8169681697 मोबाईल क्रमांकावर तक्रार केल्यास पालिका या ठिकाणी स्वच्छता करीत आहे. 7 जूनपासून या ठिकाणी आलेल्या 2136 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे.





























































