
सामना प्रतिनिधी । हिंगोली
हिंगोली शहरापासून जवळच असलेल्या सुराणानगर भागातील एका 12 वर्षीय मुलीची जिल्हा पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांनी व एका त्यांच्या साथीदाराने छेड काढून विनयभंग केल्याची घटना 12 जुलै रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता घडली. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कर्मचाऱ्यांची दोन्ही मुले अल्पवयीन असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
हिंगोली शहराच्या सुराणानगर भागातील बारा वर्षीय मुलगी तिच्या मैत्रिणीसह 12 जुलै रोजी सायंकाळी सव्वासहा वाजता घराकडे जात होती. खटकाळी बायपास ते खुराणा पेट्रोल पंपाच्या दरम्यान 3 मुलांनी या अल्पवयीन मुलींचा पाठलाग केला. तसेच त्यातील एकाने मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तीन जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांपैकी दोघे पोलीस कर्मचाऱ्यांची मुले असून ते देखील अल्पवयीन आहेत. ही दोन्ही मुले अकरावीत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिसांकडून वरिष्ठांना पाठवण्यात येणाऱ्या गुन्हे अहवालामध्ये दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावाचा उल्लेख त्यांच्या आरोपी मुलांच्या नावासमोर करण्यात आलेला नाही. उजगरे व वाढवे नामक दोन पोलीस कर्मचाऱ्यांची ही मुले असल्याचे सांगून या पोलीस कर्मचाऱ्यांचे पूर्ण नाव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
दरम्यान, सुराणानगर परिसरातील नागरिकांनी या मुलांना चांगलाच चोप दिला.

























































