
जेवणानंतर आपण प्रत्येकजण काही ना काही चघळतो. खासकरून जेवल्यानंतर आपल्यापैकी अनेकजण बडीशेप खातात. बडीशेप ही केवळ मुखशुद्धीसाठी नव्हे तर, आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानली जाते. आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये बडीशेपची एक डबी ही कायम पाहायला मिळते. आत्तापर्यंत आपण जेवण झाल्यानंतर प्रत्येकाने बडीशेप ही खाल्ली असेल.
तोंडाची चव वाढविण्यासाठी बडीशेप हा एक उत्तम उपाय आहे. तोंडाची चव तसेच खाल्लेले अन्न पचनासाठी सुद्धा बडीशेप गरजेची आहे. इतकेच नव्हे तर, बडीशेपमध्ये मुबलक प्रमाणात लॅक्टोजेनिक गुणधर्म असतात. नवमातांसाठी दूध येण्यासाठी बडीशेप खाणे खूपच गरजेचे आहे. जेवणानंतर बडीशेप खाण्याचे असे काय फायदे आपल्या आरोग्यास होतात हे आपण बघूया.
बडीशेप ही त्वचेसाठी सुद्धा वरदान मानली जाते. बडीशेपमध्ये झिंक, कॅल्शियम आणि सेलेनियमचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळेच आपली त्वचा थंड राहण्यास मदत होते. तसेच बडीशेप खाण्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यास मदत होते.
बडीशेप रक्तशुद्धीसाठी सुद्धा प्रचंड गुणकारी आहे. यामुळे विविध आजारांवर मात करता येते.
बडीशेपमुळे श्वासातील दुर्गंधी कमी होते, त्याचबरोबर प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.
बेलाचे फळ आपल्या आरोग्यासाठी वरदान का मानले जाते, वाचा सविस्तर
हृद्यरोगासाठी बडीशेप खाणे अतिशय उत्तम मानले जाते. बडीशेपमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम आढळते. तसेच बडीशेपमध्ये कमी कोलेस्ट्राॅल आढळते त्यामुळे हृद्याच्या आरोग्यासाठी हे उत्तम असते.
आपले पचन सुधारण्यासाठी बडीशेप ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बडीशेप मध्ये असलेल्या गुणधर्मामुळे, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. बडीशेपमुळे आपल्या शरीरात पाचक रस वाढण्यास मदत होते, त्यामुळे आपले पचनही सुधारते.
वजन कमी करण्यासाठी बडीशेप मोलाची भूमिका बजावते. बडीशेपमध्ये अँटिऑक्सिडंट असल्याकारणाने, चयापचय वाढते. तसेच यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासही मदत होते.