
गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या लालबागमध्ये आज शिवसेना–मनसे–राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा दणदणीत विजयी निर्धार मेळावा उत्साहात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये नवचैतन्य संचारले.
लालबाग प्रभाग क्रमांक २०४ मधून शिवसेना–मनसे–राष्ट्रवादी युतीचे उमेदवार शिवसेनेचे किरण तावडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आज भव्य विजयी निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्यात बोलताना शिवसेना नेते व खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि लालबाग यांच्यातील अतूट नात्याच्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही लालबागशी असलेले आपले ऋणानुबंध कायम असल्याचे सांगितले. लालबाग हा निष्ठावंतांचा बालेकिल्ला असून येथे शिवसेनेची विजयाची परंपरा कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विजयी निर्धार मेळाव्याप्रसंगी आमदार अजय चौधरी, शिवसेना सचिव सुधीर साळवी, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, शाखा संघटक कांचन घाणेकर यांच्यासह शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिंचपोकळी–लालबाग फक्त शिवसेनेचेच!
विधानसभा निवडणुकीत भाजप–शिंदे गटाचे काही उमेदवार निवडून आले असले, तरी राज्यात कुठेही जल्लोष पाहायला मिळाला नाही. सर्वत्र शांतता होती. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे एकत्र आल्यानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यात घराघरांत आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले.
यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही चिंचपोकळी–लालबाग हा शिवसेनेचा अभेद्य गड असून तो शिवसेनेकडेच राहणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.


































































