जनतेच्या निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची बनावट सही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बोगस शिक्के मारून कार्यवाहीचे आदेशही दिले,पोलिसात तक्रार

मिंधे सरकारच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंगले आणि कार्यालयामध्ये दलालांचा सुळसुळाट झाल्याचे नवीन नाही. आता जनतेकडून येणाऱया निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची बनावट सही आणि शिक्के मारून कार्यवाहीचे आदेश दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री सचिवालयाकडून मरिन लाईन्स पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री सचिवालयाकडे आलेल्या दहा ते बारा निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची बनावट सही आणि संशयास्पद शिक्के आढळून आले. सचिवालयातील कर्मचाऱयांच्या निदर्शनास ही बाब आली. त्याबाबत तातडीने मुख्यमंत्र्यांनाही माहिती देण्यात आली. त्यांनी त्याची गंभीर दखल घेत पोलिसात तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले. सचिवालयातील कर्मचाऱयांनी अधिक सतर्क राहून काम करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी आणि शेरे असणारी विविध निवेदने आणि पत्रे पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री सचिवालयाकडे येत असतात. या निवेदनांची टपाल शाखेत नोंद होते आणि नंतर ई-ऑफिस प्रणाली नोंद करून संबंधित विभागांना पाठवली जातात.

मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी व त्यांच्या नावाने स्टँम्पचे बनावटीकरण केल्या प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातील डेस्क अधिकाऱयाने दिलेल्या तक्रारीवरून मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात 420, 465, 468, 471, 473 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.