सामना , विशेष प्रतिनिधी । नवी दिल्ली
गेल्या चार वर्षांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला न जुमानता कारभार करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांनी निवडणुकीची चाहूल लागताच समर्पित कार्यकर्त्यांचे केडर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चुचकारण्यास सुरुवात केली आहे. संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसाठी पंतप्रधानांनी आज खास मेजवानीचे आयोजन आपल्या ७ लोककल्याण मार्गावरील निवासस्थानी केले होते.
नरेंद्र मोदी व अमित शहा हे दोन्ही नेते संघाच्या मुशीतून घडले असले तरी गेल्या चार वर्षांत त्यांनी संघाला बाजूला सारून कारभार केला होता. त्यामुळेच संघातर्फे कृष्णगोपाल यांनी दिलेली पदाधिकाऱयांच्या नेमणुकीसंदर्भातील शिफारशीची यादी मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाली तरी पंतप्रधान कार्यालयात धूळ खात पडून आहे. संघाने शिफारस केलेल्या पदाधिकाऱयांना शासकीय पदे अद्याप मिळू शकलेली नाहीत. भाजपांतर्गत पक्षसंघटनेत संघटनमंत्री हा सर्वात शक्तिशाली मानला जातो, मात्र अमित शहा यांनी विद्यमान संघटनमंत्री रामलाल यांना अगदीच किरकोळीत काढत आपला कारभार दामटल्याने संघपरिवारात नाराजी आहे.
डिनर डिप्लोमसीद्वारे पंतप्रधान मोदी संघाशी असलेली कटुता कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे भाजपातील सूत्रांचे म्हणणे आहे.
भाजपाविरोधात देशभरात धर्मनिरेपक्ष आघाडी निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीची सत्ता राखणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळेच संघाला दुखावून चालणार नाही या हिशेबी धोरणातून आजच्या मेजवानीचा मेन्यू शिजल्याचे सूत्रांनी सांगितले.

























































