
>>खंडुराज गायकवाड
राजकीय क्षेत्रात कार्य करणारे लोकप्रतिनिधी, पत्रकार, राजकीय अभ्यासक यांच्यासाठी विविध राजकीय विश्लेषण करणारे आणि ज्ञानाचे गुरुत्व लाभलेले ‘गुरुजी’ नावाचे संग्राह्य पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. सदर पुस्तक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि व्यासंगी पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांनी लिहिले आहे.
यापूर्वी त्यांचे ‘पासष्टय़न’ हे पहिले पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यानंतर त्यांनी लगेच दुसरे ‘गुरुजी’ नावाचे पुस्तक लिहून महाराष्ट्रातील राजकारणाचा अभ्यास करणाऱ्यांच्या हाती मौल्यवान खजिना भेट म्हणून दिला आहे. हे पुस्तक निश्चितच बुद्धीला ज्ञान व विचारांची मशागत करणारे राहील. या पुस्तकामध्ये स्वतंत्र हिंदुस्थानपासून आतापर्यंतचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, महाराष्ट्राचे पहिले मंत्रिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, विधान परिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद विरोधी पक्षनेते, विधानसभा विरोधी पक्षनेते, यांचा कार्यकाळ तारखांसह प्रसिध्द केला आहे. यामध्ये ब्रिटिश भारताच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या राज्यपालांच्या यादीचाही समावेश आहे.
हिंदुस्थानी राज्य घटना निर्मितीचा समग्र इतिहास, 1998 सालची निळाई शेवटची कशी ठरली, मंत्रालयाला दिवाकर रावते यांनी मिळवून दिलेला ‘पत्ता’, तीनही राष्ट्रपती राजवटीचे साक्षीदार असलेले शरदचंद्र पवार, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून असलेली पक्षांतराची परंपरा, माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांनी ‘कमळा’वर लढविलेली लोकसभेची निवडणूक, राज्य घटना मंजुरीनंतर 1952 सालानंतरची राज्यातील निवडणूक असे अनेक बारीक-सारीक संदर्भ आणि तपशील देऊन लिहिलेल्या या पुस्तकात राजकीय किस्से आणि विवेचनात्मक राजकीय मजकूर वाचनीय आहे.
उदय पै यांनी तयार केलेले अतिशय सुंदर आणि आकर्षक मुखपृष्ठ असलेले ‘गुरुजी’ हे पुस्तक विशेषतः वृत्तपत्रसृष्टीत काम करणाऱ्या संपादकीय विभागाला प्रेरणादायी ठरणारे आहे. ‘पुस्तक हेच धन, पुस्तक हेच गुरू!’ या संदेशाप्रमाणे ‘गुरुजी’ पुस्तक हे बरंच काही सांगून जाते. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य आणि योगेश त्रिवेदी ही जोडी पत्रकारितेत अर्धशतकाहून अधिक काळ एकत्र फिरताना दिसते. त्यामुळे ओघानेच विजय वैद्य यांचे बहुमोल सहकार्य योगेश त्रिवेदी यांच्या पुस्तकांसाठी मिळाले, हा त्यांना प्रबोधनकार आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मिळाल्याचे ते कृतज्ञतापूर्वक मान्य करतात.
गुरुजी
लेखक – योगेश वसंत त्रिवेदी
प्रकाशक – उदय पै एड आर्टस्
पृष्ठ – 140, मूल्य – रुपये 200/-


























































