क्रिकेट स्पर्धेमुळे शैक्षणिक वर्ष हुकलेल्या विद्यार्थ्याला युवासेनेमुळे दिलासा

क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या माटुंगा येथील खालसा महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱया एका विद्यार्थ्यांना युवासेनेमुळे दिलासा मिळाला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या 16 वर्षाखालील संघातून भामा चषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाल्याने अकरावीत शिकणाऱया अभिनव साहा या विद्यार्थ्याला ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स (ओसी) विषयाची वार्षिक परीक्षा देता आली नाही. या विद्यार्थ्याचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी अभिनवची ओसी विषयाची परीक्षा घेऊन त्याचे वाया जाणारे शैक्षणिक वर्ष वाचवावे, अशी मागणी युवासेनेने खालसा महाविद्यालयाकडे केली. या मागणीची महाविद्यालयाने योग्य दखल घेतली आहे.

महाविद्यालयाकडून परीक्षेदरम्यान क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी पूर्वपरवानगी घेऊनही महाविद्यालयाने अभिनव साहा या विद्यार्थ्याला नापास ठरवत पुन्हा अकरावीत फेरप्रवेश घेण्यास सांगितले. याप्रकरणी विद्यार्थ्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असता सदर तक्रारीची दखल घेऊन युवासेना माजी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत आणि राजन कोळंबेकर यांनी गुरुनानक खालसा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रत्ना शर्मा तसेच विश्वस्त डॉ. किरण माणगावकर आणि डॉ. जसपीर काwर यांच्याशी संपर्क साधत खालसा महाविद्यालय हे सातत्याने सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत असताना सदर विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये अशी भूमिका मांडली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देऊन प्राचार्या शर्मा यांनी सदर विद्यार्थ्याला न्याय देण्याचे आश्वासन दिले.