
सामना ऑनलाईन । गोरखपूर
चोर आपली चोरी लपवण्यासाठी शक्य त्या सगळ्या युक्त्या वापरतात. पण, शेराला सव्वाशेर या म्हणीप्रमाणे कोणीतरी हुशार त्यांना भेटतो आणि त्यांचं पितळ उघड पडतंच. असंच काहीसं गोरखपूर येथील महिला चोराच्या बाबतीत झालं आहे.
गोरखपूर येथील पिपराईच गावातल्या एका सोन्याच्या पेढीवर दैनंदिन कामकाज सुरू होतं. तिथे खरेदी करण्याच्या बहाण्याने पोहोचलेल्या एका महिलेने कर्मचाऱ्यांच्या नकळत एक सोन्याचा झुमका चोरला. दुसरा झुमका चोरायच्या विचारात असताना, कर्मचाऱ्याला एक झुमका कमी असल्याचं लक्षात आलं. त्याने तिथे उपस्थित असलेल्या सर्व ग्राहकांची चौकशी करायला सुरुवात केली. या गडबडीमुळे चोराची घाबरगुंडी उडाली आणि तिने तो झुमका चक्क गिळून टाकला.
सर्व ग्राहकांकडे चौकशी केल्यानंतर या महिलेवर पेढीच्या मालकाचा संशय बळावला. कारण, तिला झुमका गिळताना काही ग्राहकांनी पाहिलं होतं. तरीही आपण चोरी केली नसल्याचं त्या महिलेचं म्हणणं होतं. पण, इतर ग्राहकांच्या साक्षीमुळे मालकाने ताबडतोब पोलिसांना बोलवत तिची वैद्यकीय चाचणी करण्याची मागणी केली. पोलिसांनी त्वरीत तिला रुग्णालयात आणलं. तिथे तिच्या पोटाच्या एक्स-रेमध्ये झुमका आढळून आला. एक्स-रे दाखवताच महिलेची बोबडी वळली आणि पोलिसांसमोर तिने आपला गुन्हा कबूल केला.
























































