
दहा वर्षांपूर्वी आधारकार्ड काढले असेल आणि ते अद्याप अपडेट केले नसेल, तर ते तत्काळ करणे आवश्यक आहे. जुने आधार अपडेट नसेल, तर कार्डधारकाला काही तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आधार अपडेटसाठी 14 सप्टेंबरपर्यंत विनामूल्य अपडेट करण्याची डेडलाइन उपलब्ध आहे. त्यानंतर अपडेट करण्यासाठी 50 रुपये दंड भरावा लागू शकतो. आधारची खात्री करण्यासाठी पुनर्प्रमाणीकरण महत्त्वाचे आहे. आधार प्रमाणीकरणमध्ये पडताळणीसाठी यूआयडीएआयच्या डेटाबेसमध्ये बायोमेट्रिक माहितीसह आधार क्रमांक सबमिट करणे याचा समावेश आहे.
ऑनलाइन आधार अपडेटसाठी हे करा
– आधार अपडेट करण्यासाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध आहे. सर्वात आधी आधारच्या अधिकृत वेबसाइट myaadhaar.uidai.gov.in किंवा https://myaadhaar.uidai.gov.in ला भेट द्या.
– आधार क्रमांक आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पाठवलेला ओटीपी वापरून लॉग इन करा.
– आधार प्रोफाइलमधील दिसत असलेली सविस्तर माहिती तपासा आणि सध्याचा पत्ता तपासून घ्या.
– सर्व तपशील बरोबर असल्यास वरील तपशील बरोबर आहेत या पर्यायावर क्लिक करा.
– आधार कार्डवरील ओळख आणि पत्ता पडताळणीसाठी सबमिट कराल ते दस्तऐवज निवडा.
– अपडेटसाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. प्रत्येक फाइल दोन एमबीपेक्षा कमी आणि जेपीईजी किंवा पीडीएफ फॉरमॅटमध्ये असल्याची खात्री करा.
– आधारकार्ड अपडेट करण्यासाठी सर्व तपशील सबमिट करा.
























































