
बाळासाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व हे स्वतंत्र अभ्यास आणि संशोधनाचा विषय आहे. आपल्या जडणघडणीत बाळासाहेबांचे मोठे योगदान असून त्यांच्याकडून मिळालेल्या शिकवणीतून पुढे जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या श्रीमान बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र, सार्थ प्रतिष्ठान आणि मुंबई न्यूज फोटोग्राफर असोसिएशन यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित श्रीमान बाळासाहेब ठाकरे: चित्र आणि चरित्र या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला भेट देऊन त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. नातवंड आणि आजोबा म्हणून बाळासाहेबांसोबतचे नाते घट्ट होते. लहानपणी त्यांच्या सानिध्यात वावरतांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. बाळासाहेबांचे व्यक्तीमत्वाचे पैलू उलगडताना पुढे ते म्हणाले की बाळसाहेब हे स्टायलीश नेते होते, त्यांना केश आणि वेश यांची पक्की जाण होती, त्यांच्या राहण्या-वागण्यातील टापटिपपणा हा वाखाण्याजोगा होता. जीवनात आणि राजकारणात काय तत्वे असावीत हे बाळासाहेबांकडून शिकायला मिळाले. आत्मविश्वास आणि मेहनतीच्या बळावर यश प्राप्त होत असल्याचा मूलमंत्र त्यांच्याकडून मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरातील विविध प्रसिद्ध भाषेतील शब्दकोशांवर बाळासाहेबांचे विशेष प्रेम होते. बाळासाहेंबामुळे वाचनाची सवय जडली असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या ऐतिहासिक दीक्षान्त सभागृहात भरविण्यात आलेल्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. या छायाचित्र प्रदर्शनाला आज राज्याचे उद्योग, खनिकर्म आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, आमदार दिवाकर रावते, आमदार मनिषा कायंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील नामवंतानी भेट दिली.
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव सुधीर पुराणिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विविध प्राधिकरणातील सदस्यांची उपस्थिती होती.
छायाचित्र प्रदर्शनाला वाढत्या प्रतिसादामुळे हे छायाचित्र प्रदर्शन आता शुक्रवार २० मे २०२२ पर्यंत सर्वासाठी खुले असणार आहे. महाराष्ट्रातील नामवंत छायाचित्रकारांनी काढलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची दुर्मिळ छायाचित्रे या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली आहेत.

























































