धारावीतील 500 विद्यार्थ्यांना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले टॅबचे वाटप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे विद्यार्थी शाळेत जाऊ शकत नाहीत. मात्र विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा हक्क अबाधित राखण्यासाठी ऑनलाइन शिक्षण पद्धत उपयोगी आहे. ऑनलाइन शिक्षणपद्धतीमुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही. त्यांना ऑनलाइन शिक्षण मिळावे, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.

धारावीतील काळा किल्ला मनपा शाळेतील 500 विद्यार्थ्यांना आज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शैक्षणिक टॅबचे वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा बंद आहेत. त्यात महापालिका शाळांमध्ये शिकणाऱया तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. घरची बेताची परिस्थिती असलेल्या या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन घेण्याची ऐपत नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शिक्षण थांबू नये, यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यावेळी खासदार राहुल शेवाळे, नगरसेवक वसंत नकाशे, महापालिका जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, शिक्षणाधिकारी राजू तडवी, आयएएचव्हीच्या प्रमुख मीरा गुप्ता आदी उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यूज (आयएएचव्ही) संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला.

कोरोनाची परिस्थिती किती दिवस चालेल माहीत नाही. पण त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होता कामा नये. यापूर्वी शाळेत शिकण्यासाठी टॅब दिले होते, परंतु आता ऑनलाइन शिक्षणासाठी टॅब देण्यात येत आहेत. हा बदल लक्षात घेता विद्यार्थ्यांनी नवनवीन शिक्षणपद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
z आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री