
मतदार देवतेने लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला आणि युतीला भरभरून आशीर्वाद दिला. त्या देवाचे आभार व्यक्त करण्यासाठीच मी ‘जन आशीर्वाद’ यात्रा काढली. मतदार देवतेचा हा आशीर्वाद कायम राहील, असा विश्वास शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त करताच अकोल्याचा वाडेगावचा परिसर ‘शिवसेना झिंदाबाद’च्या जयघोषाने दुमदुमला. उपस्थित हजारो शेतकरी बांधव आणि माता-भगिनींनी हात उंचावून आदित्य ठाकरे यांना आशीर्वाद दिले.
आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा गुरुवारी वाडेगावमध्ये होती. तिथे आयोजित विजय संकल्प मेळाव्यात हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. नवा महाराष्ट्र घडवायचा असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी त्यांना केले. बेरोजगारीमुक्त, कर्जमुक्त आणि शैक्षणिक दृष्टीने उत्तम असा महाराष्ट्र पाहिजे की काँग्रेस आघाडीने बिघडवलेला महाराष्ट्र पाहिजे याचा विचार आपण करावा असे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, विप्लव बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, श्रीरंग पिंजरकर आदी उपस्थित होते. तत्पूर्वी, आदित्य ठाकरे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सभागृहामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधला.
अडचण आल्यास बिनधास्त शाखेत या!
कोणतीही अडचण आली तर शिवसेनेच्या शाखेवर जाऊन आपली अडचण सांगा, शिवसैनिक आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास यावेळी आदित्य ठाकरे यांनी यावेळी शेतकऱयांना दिला. यावेळी अनेकांनी त्यांना निवेदने दिली. प्रत्येक निवेदन वाचून आपण त्यावर निश्चितच योग्य पावले उचलू असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी त्यांना दिले.


























































