जनतेच्या समस्या मार्गी लावणारच; जनआशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरे यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने जनतेचे नेमके प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही शिवसेनेला मतदान केल्यामुळे तुमचे आभार मानण्यासाठी ही यात्रा आयोजित केली आहे, असे शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.या दौऱ्यातून ज्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या,ज्या समस्या आपल्यासमोर मांडण्यात आल्या, ते प्रश्न मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न आहे, त्यात यशही मिळत आहे. बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी तुमच्या सर्वांची साथ आपल्याला हवी आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने देगलूर येथे शिवसेना आमदार सुभाष साबणे यांनी आयोजित केलेल्या विजयी संकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरे मार्गदर्शन करत होते. व्यासपीठावर सचिन अहिर, पूर्वेश सरनाईक, सिध्देश कदम, रुपेश कदम, साईनाथ दुर्गे, अमित गिते, शिवसेनेचे नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख महेश पाटील, विक्रम साबणे आदींची यावेळी उपस्थिती होती.

आपण किती किलोमीटर प्रवास केला हे माझ्या दृष्टीने महत्वाचे नाही, तुमच्या सर्वांचे प्रेम किती मिळते, तुमचा सर्वांचा आशीर्वाद कसा मिळतो हे मला महत्वाचे आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत मग तो विजेचा असो, रस्त्याचा असो, पाड्यावरील आरोग्यसेवेचा असो, आदिवासी भागातील शाळेचा असो, हे प्रश्न सोडविण्यासाठी आता आपल्याला कंबर कसावी लागणार आहे. दौऱ्याच्या निमित्ताने अनेकांनी त्यांचे प्रश्न मांडले, अनेकांनी निवेदने दिली. राजकीय मंडळी येतात, फोटो घेवून जातात आमचे प्रश्न तसेच राहतात असेही लोकांनी सांगितले. मात्र, जे महत्वाचे प्रश्न आहेत व तातडीने सोडवण्यासारखे आहेत, त्याबाबत मी लगेच अनुकूलता दर्शवली आणि ते प्रश्न मार्गी लावले. सोलापूर तालुक्यातील एका जलसिंचन प्रकल्प 1999 ला मंजूर झाला होता. त्याची साधी विटही उभारली नव्हती, याबाबत संबंधित मंत्र्यांना बोलावून हा प्रकल्प मार्गी लावला आहे. त्याचे काम लवकरच सुरु होणार आहे, असेही आदित्य यांनी सांगितले. एमआयडीसीच्या पाट्या दिसतात, जमिनी दिसतात. मात्र, त्याठिकाणी उभारण्यात आलेल्या कारखान्यात बाहेरच्या मंडळींना रोजगार मिळतो. मात्र, त्याच परिसरामध्ये अशा प्रकारचे शिक्षण निर्माण करावे लागेल. त्यामुळे कारखान्यात तेथील बेरोजगारांचा प्रश्न सुटून तेथेच नोकऱ्या मिळतील. यासाठीही माझा प्रयत्न आहे. दुष्काळाची परिस्थिती आहे, सिंचनाचा प्रश्न आहे, पीकविम्याचा प्रश्न आहे, हे प्रश्नही आम्ही मार्गी लावत आहे. मुंबईमध्ये निघालेल्या पिकविम्याच्या संदर्भातील मोर्चानंतर पिकविमा कंपन्या हादरल्या आहेत. हळूहळू शेतकऱ्यांना पिकविमा मिळत आहे. शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी आम्ही करुन दाखविणारच आणि त्यासाठी आमचे प्रयत्न सुरुच आहेत. पूर्ण कर्जमाफी होणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी तसेच दुष्काळ, बेरोजगारी, सिंचनाचे प्रश्न पूर्णतः मार्गी लागण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे आणि तो आशीर्वाद मागण्यासाठी मी तुमच्यात आलो आहे, असेही आदित्य यावेळी म्हणाले.

यावेळी आमदार सुभाष साबणे यांनी आपल्या मतदारसंघात शेतकरी, निराधार मंडळींसाठी केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच जनहिताची केलेली कामेही जनतेसमोर मांडली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्याहस्ते आत्महत्या केलेल्या 21 शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादी तसेच अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.