
मनुष्याप्रमाणे पाळीव प्राण्यांनाही उद्यानात शांतपणे वावरता यावे यासाठी हवेशीर लॉन, चालण्यासाठी ट्रक, भरपूर झाडे त्याचप्रमाणे व्यायाम घडावा यासाठी खेळणी आणि आजारी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी दवाखाना अशा सुविधा असलेले उद्यान मुंबई महापालिका आणि एकता मंच या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून वर्सोवा येथे साकारण्यात आले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज उद्यानाचे उद्घाटन झाले.
अंधेरीमधील वर्सोवा येथील यारी रोड विस्तारित मार्गावर महापालिकेच्या 468.40 चौरस मीटर जागेवरील हे उद्यान नगरसेविका आणि बाजार उद्यान समिती अध्यक्षा प्रतिमा खोपडे यांच्या प्रयत्नामुळे विकसित करण्यात आले आहे. याआधी बोरिवली येथेही अशाच प्रकारे केवळ प्राण्यांसाठी एक उद्यान विकसित करण्यात आले आहे. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, उपविभागप्रमुख राजेश शेट्टे, के-पश्चिमचे साहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चौहान, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, शैलेश फणसे, एकता मंचचे अध्यक्ष अजय कौल यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पाळीव प्राणी हे केवळ प्राणी नसतात तर ते आपल्या कुटुंबातील एक भाग असतात. त्यांची भाषा, त्यांचे हावभाव, त्यांची देहबोली आपल्याला कळू लागते. त्यामुळे माणसांप्रमाणे त्यांनाही काही वेळ मुक्तपणे फिरता यावे यासाठी हे उद्यान उभारण्यात आले आहे.
- आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

























































