
मुंबईतील रस्ते, पदपथ, पाणी, आरोग्य या मूलभूत सुविधांसह मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. ताडदेव येथील वसंतराव नाईक चौकातील वाहतूक बेटाच्या सुशोभीकरण कामाचे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईकरांसाठी सर्व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित आहेत. मुंबईकरांपेक्षा कोणी मोठा नसून मुंबईकरांचा आवाज हा सर्वात मोठा आहे. विकासकामे करीत असताना हा विभाग, प्रभाग तसेच कुठल्या पक्षाचा नगरसेवक आहे हा भेदभाव न करता मुंबईकरांची कामे करीत आहोत. जी/ उत्तर विभागामध्ये सुविधा केंद्रांची कामे ही देशातील सगळ्यांनीच येऊन पाहावीत अशी आहेत. मुंबईच्या शाश्वत विकासाची कामे आपण पुढे नेत आहोत. या सर्व कामांना लोकांचा प्रतिसाद मिळत असून ती आमच्यासाठी खरी शक्ती, ऊर्जा आहे, असेही ते म्हणाले. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, आमदार मंगलप्रभात लोढा, सी व डी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल पटेल, नगरसेविका अरुंधती दुधवडकर, सरिता पाटील, माजी नगरसेवक अरुण दुधवडकर, उपायुक्त (परिमंडळ -1) रणजीत ढाकणे, ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

























































