
सामना प्रतिनिधी । सोलापूर
लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी व ज्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही त्या मतदारराजाचे मन जिंकण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱया टप्प्याला बुधवारी सोलापुरातून प्रारंभ होत आहे. या यात्रेत आदित्य ठाकरे हे समाजाच्या प्रत्येक घटकाशी, युवाशक्तीशी ‘आदित्य संवाद’च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे 31 जुलै ते 4 ऑगस्ट या काळात ‘जनआशीर्वाद यात्रे’चा दुसरा टप्पा काढणार आहेत. त्याची माहिती देण्यासाठी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची पत्रकार परिषद आयोजित केली होती. बुधवारी (दि. 31) सकाळी आदित्य ठाकरे यांचे मुंबईहून सोलापूर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता वालचंद महाविद्यालयात ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापुरातील कार्यक्रमानंतर आदित्य ठाकरे यांचे मोहोळ शहरात भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर शिवाजी चौक माढा येथेही स्वागत करण्यात येणार आहे. धाराशीव जिह्यातील हिंगणगाव, परांडा येथे ‘विजय संकल्प मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर बार्शी येथील बीआयटी महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बार्शी येथील कार्यक्रमानंतर सोलापूर जिह्यातील पांगरी येथे आदित्य ठाकरे यांचे स्वागत होणार आहे. त्यानंतर ते धाराशीव जिह्यातील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत, असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले.
31 जुलै – सोलापूर, धाराशीव
1,2ऑगस्ट – लातूर, नांदेड, परभणी
3 ऑगस्ट – परभणी शहर, हिंगोली
4 ऑगस्ट – बीड


























































