शून्य कार्बन उत्सर्जनच्या रेस टू झीरो मोहिमेत महाराष्ट्रातील 43 शहरे सहभागी होणार

मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे, नागपूर, नाशिक, संभाजीनगर या शहरांपाठोपाठ महाराष्ट्रातील 43 शहरांमध्ये शून्य कार्बन उत्सर्जनाची ‘रेस टू झीरो’ ही आंतरराष्ट्रीय मोहीम राबविण्यात येणार आहे. पर्यावरणाचे जतन करून वातावरणातील बदलाच्या दुष्परिणामांपासून दूर राहण्यासाठी ही मोहीम जगभरात राबविली जात असून महाराष्ट्र हा त्याचा एक भाग आहे, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सांगितले.

गेटवे ऑफ इंडिया येथे ग्लोबल सिटिझन लाइव्ह कार्यक्रमात बोलताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याची माहिती दिली. क्लायमेट विक, एनवायसी, 2021 आणि ग्लोबल सिटिझन लाइव्ह कॅम्पेनचा भाग म्हणून या शहरांना सहभागी करण्यात आले आहे. शाश्वत विकासाकरिता जगभरात होत असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही या मोहिमेत सहभागी होत असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

जागतिक वातावरण बदलाचा महाराष्ट्रालाही फटका

महाराष्ट्रात झालेले औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाचा लाभ राज्याच्या अर्थकारणालाही झाला. मात्र याच्या परिणामी वातावरणातील बदलांचा फटकाही राज्याला बसू लागला आहे. राज्यात मागील काही वर्षांत दुष्काळाच्या प्रमाणात 7 टक्क्यांनी तर पुराच्या घटनांमध्ये 6 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानभरपाईपोटी मागील वर्षी 14 हजार कोटी राज्याला खर्च करावे लागले. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन करून नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी महाराष्ट्र या मोहिमेत सहभागी होत आहे. याआधीच ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात वृक्षलागवड करून राज्याने एक पाऊल टाकले आहे. त्याच प्रमाणे राज्यात 700 सोलर पंप, इलेक्ट्रिक वाहनांसाठीं 104 चार्ंजग स्टेशन उभारले असून बेस्टच्या ताफ्यात 350हून अधिक इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या