
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट) अधिसूचनेच्या मसुद्याचे पुनर्मूल्यांकन करण्याची विनंती केली आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातर्फे येऊ घातलेल्या पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन मसुद्यात विकासासाठी निसर्गाचा ऱ्हास करण्याचे मार्ग खुले करून देण्याचा प्रयत्न होत असल्याचे पर्यावरण तज्ञांचे म्हणणे आहे. ईआयए 2020 मसुदा पर्यावरणाच्या मूळावर येईल असेही तज्ञांचे म्हणणे आहे. नव्या मसुद्यानुसार एखाद्या बेकायदा प्रकल्पाचे काम सुरु झाल्यास ते सांगण्याचा अधिकार स्थानिकांना किंवा पर्यावरणप्रेमींना राहणार नाहीत. या नव्या मसुद्यात जनसुनावणी होणार नाही. अनेक प्रकल्पांचा परिणाम शोधण्यासाठी केला जाणारा अभ्यास यापुढे होणार नाही. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास या मसुद्यामुळे बळ मिळते असा तज्ञांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवले आहे.
ईआयए अधिसूचनेच्या मसुद्यामध्ये पर्यावरणीयदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्राची परिभाषा संकुचित करण्यात आली असून त्यामधून गावे, जंगले आणि किनारपट्टी वगळण्यात आली आहेत. पर्यावरणासंदर्भात निर्णय घेताना राज्य सरकारच्या भूमिकेला कमी महत्व दिल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून त्याचे पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांवर थेट परिणाम होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे यावरील राज्य सरकारचे नियंत्रण कमी केल्याचा थेट परिणाम पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांवर होईल, याकडे आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.

























































