
नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना शिवसेनेमुळेच नव्या घरांच्या चाव्या मिळाल्या, असा टोला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी लगावला.
गुढीपाडव्यानिमित्त आदित्य ठाकरे आज गिरगाव आणि वरळीतील शोभायात्रांना उपस्थित राहिले. यावेळी प्रसारमाध्यमांशीही त्यांनी संवाद साधला. बीडीडी चाळ हा आदित्य ठाकरे यांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना यावेळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 1 ऑगस्ट 2021 रोजी बीडीडी पुनर्विकास योजनेला सुरुवात झाली होती. वरळीतील बीडीडीवासीयांना घरे मिळाली. नायगाव बीडीडीवासीयांना प्रकल्प उभा राहून दोन-तीन महिने झाले तरी घरांच्या चाव्या वाटप होत नव्हते. शिवसेनेच्या आंदोलनानंतर सरकारला त्या देणे भाग पडले. तिथे काहींनी चाव्या मारायचे काम केले होते, मात्र शिवसेनेने चाव्या वाटप करून घेतले हा फरक आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.


























































