कोकणचा शाश्वत विकास हेच आमचे ध्येय – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते मंगळवारी श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्यांतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते सिंधुरत्न समृद्ध योजनेचेही लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी कोकणचा फक्त विकास न करता शाश्वत विकास हेच आमचे ध्येय असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

सिंधुरत्न समृध्द योजना महत्त्वाची योजना आहे. त्यामुळे कोकणचा विकास होणार आहे. आम्ही निवडणुकीपूर्वी आणि सत्ता आल्यानंतर दिलेली वचने पूर्ण करत आहोत. ‘प्राण जाय पर वचन न जाय’ हीच आमची विकासकामांबाबतची भूमिका आहे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. प्रत्येक ठिकाणी नवीन योजना आणण्यात येत आहेत. फक्त विकास न करता शाश्वत विकासावर भर देण्यात येत आहे. कोरोना काळातही विकासकामे वेगाने सुरू होती. चिपी विमानतळ पूर्ण झाला आहे. विमानतळ झाल्यावर समृद्धी येतेच येते. आता चिपी विमानतळ पूर्ण झाल्यामुळे कोकणाचाही विकास होणार आहे.

कोकणात निसर्गसौंदर्य भरपूर आहे. त्यामुळे खानपान आणि पर्यटन यात विकासाला मोठा वाव आहे. पावसाळ्यात कोकणात निर्सग बहरतो. हे आपले वैशिष्ट्य आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार पर्यटनासाठी कोकणाला प्राधान्य देण्यात येत आहे. या निर्सग सौंदर्याचा फायदा घेत पर्यटनवाढ करण्याचा विचार आहे. कोकणात संधी आहे, तेवढाच धोकाही आहे, त्याचाही विचार करायला हवा. विकास हवा पण तो शाश्वत विकास हवा. पर्यावरणाची हानी करत झालेल्या विकासामुळे नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढतो. गेल्या काही वर्षात राज्याला वादळांचा फटका बसला आहे. त्यामुळे विकास करताना याचाही विचार करण्याची गरज आहे. विकास करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.

विकास करताना स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे. कोकणातल्या घरात अनेक पर्यटक राहतात. त्यातही भूमिपुत्रांना चांगली संधी आहे. त्यातून प्रत्येक घराचे हॉटेल होऊ शकते. त्यासाठी धोरण आणण्यात येणार आहे. मुंबईचा विकास हा कोकणी माणासाने झाला आहे. कोकणाच्या माणसाच्या घामाने आजची मुंबई उभी राहिली आहे. तसाच शाश्वस विकास आता कोकणाचा करण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. सिंधुरत्न योजना यशस्वी व्हावी, अशा शुभेच्छाही आदित्य ठाकरे यांनी दिल्या. या योजनेमुळे कोकणचा विकास होणार आहे. तसेच या जोनेतून राज्यासमोर आदर्श निर्माण होईल, असे ते म्हणाले.