अयोध्येला जाणार, लवकरच तारीख जाहीर करणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूरची जागा महाविकास आघाडीने राखली आहे. तेथील जनतेने महाविकास आघाडीवर विश्वास ठेवला दाखवला आहे. त्यांनी ही जागा विश्वासाने पुन्हा महाविकास आघाडीकडे दिली आहे. कोल्हापूर आणि राज्याच्या शाश्वत विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही ते म्हणाले.

अयोध्येतील संघर्षाचा काळ आता संपला आहे. आता प्रभू श्रीरामांचा आशिर्वाद घेण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी आपण लवकरच अयोध्येला जाणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. त्याची तारीखही लवकरच जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले. कोल्हापुरात पुन्हा महाविकास आघाडी निवडून आली आहे. त्यासाठी कार्यकर्ते आणि स्थानिकांचे आभार मानतो, असे ते म्हणाले. कोण खरा विकास करतो, हे जनतेला समजले आहे, हेच या निकालातून दिसून येते, असेही ते म्हणाले. राज्याचा विकास कोण करू शकतो, राज्याला कोण पुढे नेऊ शकतो, हे जनतेनेच दाखवून दिले आहे.

काही पक्ष नवे काहीतरी करत आहेत. आम्ही अनेक वर्षापासून हेच करत आहोत. आपले सण-उत्सव आनंदाने आणि उत्साहात साजरे झालेच पाहिजे, हीच आपली भूमिका आहे. कोरोनानंतर जनताही आता सण उत्सव साजरे करत आहे, ही चांगली बाब असल्याचे ते म्हणाले. अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. राणी बाग प्राणीसंग्रहालयातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे लोकार्पण झाले आहे. त्यातून सुमारे 5 लाख लिटर पाणी शुद्ध होणार आहे. त्यामुळे प्राणीसंग्रहालयातील पाण्याची गरज भागणार आहे. पाणी शुद्धीकरणाचा हा मोठा प्रकल्प असून त्याचा चांगला फायदा होणार असल्याचेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार – संजय राऊत

राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेना प्रमुख हे अयोध्येला जाणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. अयोध्येत शरयू नदीच्या किनारी एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून आदित्य ठाकरे यांनी आपण या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचे सांगितल्याचे राऊत म्हणाले. मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वादळे, कोरोना अशी संकटे ओढावली होती. या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारने यशस्वीपणे करून दाखवले. महाराष्ट्रात रामराज्य आणण्याचा संकल्प कायम आहे. त्यासाठी प्रभू श्रीरामाच्या चरणी जाऊन रामराज्याची संकल्पना आणि प्रार्थना करू असे राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्रातून अयोध्येत जाणाऱ्या भाविकांच्या निवास व्यवस्था असावी असा उद्धव ठाकरे यांनी संकल्प केला होता त्यासंदर्भात काही करता येईल का हे पाहण्यासाठीही आमची ही भेट आहे असे ते म्हणाले.