भाजप देशातील निसर्ग उद्ध्वस्त करत जनतेची दिशाभूल करत आहे; लोहारडोंगरी खाण मंजुरीवरून आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण रक्षणाबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. विकासाच्या नावाखाली भाजप पर्यावरणाचा ऱ्हास करत आहे. त्यामुळे जैवविविधतेला धोका असून प्रदूषणात वाढ होत आहे. तपोवनातील वृक्षतोडीला जनताही विरोध करत असताना सरकार वृक्षांवर कुऱ्हाड चालवत आहे. सरकारने आरेमध्येही मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड केली आहे. आता आदित्य ठाकरे यांनी घोडाझरीजवळील लोहारडोंगरी येथील खाण प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजप देशातील निसर्ग उद्ध्वस्त करत जनतेची दिशाभूल करत आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

याबाबत आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आज, राज्य वन्यजीव मंडळाने घोडाझरी वन्यजीव अभयारण्याजवळील लोहारडोंगरी येथील खाण प्रकल्प मंजुरीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. एसबीडब्ल्यूएलने मुख्यमंत्र्यांना माहिती दिली होती की हा एक महत्त्वाचा व्याघ्र कॉरिडॉर, वन्यजीव कॉरिडॉर आहे आणि त्यामुळे मानव-प्राणी संघर्ष (आणि वाघांशी संघर्ष) वाढेल, परंतु मुख्यमंत्र्यांनी ही योजना पुढे रेटली.

या खाणीतून केवळ १२० नोकऱ्या मिळणार आहेत, त्यापैकी फक्त ३२ कायमस्वरूपी असतील आणि १२ महिन्यांत उत्पादन केवळ १.१ दशलक्ष टन आहे. वन्यजीव आणि जंगलावर होणाऱ्या परिणामाबद्दल कोणताही अभ्यास उपलब्ध नाही, पण भाजपला जंगलतोड करायला आवडते! त्याचप्रमाणे, मंडळाने मागील बैठकीच्या इतिवृत्ताला मंजुरी दिली, ज्यामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील मार्की-मांगली येथील खाणी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. हा आणखी एक वाघ कॉरिडॉर आहे. मुंबई क्लायमेट वीक आणि त्यात सहभागी होणाऱ्या जागतिक संस्थांसमोर मुख्यमंत्री ही बाब कशी मांडतात हे पाहण्यास उत्सुक आहे.

भाजपला इतके निवडून आलेले प्रतिनिधी देणाऱ्या विदर्भ प्रदेशाचा भाजप पर्यावरणाच्या दृष्टीने नाश करत आहे. कोळसा धुलाई प्रकल्प, खाणी, जंगलतोड – आणि मग सरकार मानव-प्राणी संघर्षाबद्दल नागरिकांना दिशाभूल करते, असे आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.