
उद्योगमंत्री सामंत यांचा हा दौरा रद्द झालाच पाहिजे, अन्यथा दौरा सुरू असतानाच मी स्वतः सामंत यांच्या रत्नागिरी मतदारसंघात जाणार आहे. दौऱ्याचा काहीच तपशील दिला जात नाही. जनतेच्या पैशाने चाललेली ही उधळपट्टी योग्य की अयोग्य याची विचारणा मी मतदारांना करणार.
उद्योगमंत्री उदय सामंत 3 ऑक्टोबरला ब्रिटन दौऱ्यावर जात आहेत. मात्र या ठिकाणी होणाऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये कोणत्या कंपन्या येणार, कुणाला भेटणार, कुठली चर्चा होणार, नेमके कुठले करार होणार याबाबत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्योगमंत्री जनतेच्या पैशाने सुट्टीवर चाललेत का, असा थेट सवाल करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारमधील मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांची अक्षरशः पोलखोल केली.
आदित्य ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेत मिंधे सरकारच्या मंत्र्यांकडून परदेश दौऱ्यांच्या नावाखाली सुरू असलेल्या जनतेच्या पैशाच्या उधळपट्टीचा पर्दाफाश केला. 4 तारखेला होणाऱ्या आर्टिफिशीअल इटेलिजन्स कॉन्फरन्सची कोणतीही माहिती नाही. जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमी फोरमच्या तयारीची पाहणी 5 तारीखला करणार असल्याचे समजते. मात्र दावोसला होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेची नेमकी कोणती पाहणी एका राज्याचे उद्योगमंत्री करणार? केवळ सुट्टी घालवण्यासाठी उद्योगमंत्री जात आहेत का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे हा दौरा रद्द झालाच पाहिजे, अन्यथा दौरा सुरू असतानाच आपण स्वतः उद्योगमंत्र्यांच्या रत्नागिरी मतदारसंघात जाऊन त्यांच्या मतदारांना हे योग्य की अयोग्य याची विचारणा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर उद्योगमंत्री म्युनिचला राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी जाणार असल्याचे समजते. उद्योगमंत्र्यांचा हा दौरा हास्यास्पद असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. सरकारने खारघरसारख्या दुर्घटनेनंतर केलेल्या पाहणी दौऱ्यांचे नेमके काय झाले ते जाहीर करावे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी दौरे केले होते, हेदेखील त्यांनी निदर्शनास आणून द्याके.
फडणकीसांचा जपान दौऱ्याचा बोजा ‘एमआयडीसी’वर का?
काऊन्सिल जनरल ऑफ जपानने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केल्यामुळे या दौऱ्याचा खर्च जपानने करणे अपेक्षित होते. मात्र हा खर्च ‘एमआयडीसी’कडून केला जाणार असल्याचा जीआर निघाल्याचे आदित्य ठाकरे यांनी उघड केले. या दौऱ्याचा संपूर्ण खर्च एमआयडीसीने उचलला आहे. मग एमआयडीसीचे मंत्री या दौऱ्याला का नव्हते, असा सवालही त्यांनी केला.
दौऱ्यातून काय साध्य होणार ते आधी सांगा!
सरकारमधील अनेक मंत्री आता जनतेच्या पैशांवर ‘फॉरेनची ट्रीप’ करायला लागले आहेत. या दौऱ्यांमधून नक्की काय फायदा होतोय हे त्यांना विचारायला हवं. मुख्यमंत्र्यांचा जर्मनी आणि लंडन दौरा होता. जर्मनीला जाऊन त्यांना हायवे बघायचे होते. त्यांच्याकडे इतकी वर्षे ‘एमएमआरडीए’चे खाते आहे. मग आता तिथे जाऊन हायवे का बघायचे आहे? त्यामुळे परदेश दौऱ्यांवर जाण्याआधी दौऱ्यातून काय साध्य होणार ते आधी सांगा, असे आव्हानच आदित्य ठाकरे यांनी दिले. आपण मंत्री असताना प्रत्येक दौऱ्याचे संपूर्ण डिटेल्स मीडिया आणि सोशल मीडियातही जाहीर केले होते.
मिंधे फक्त टेंडर शोधत फिरतात
घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने महापालिकेत झालेला 263 कोटींचा स्ट्रीट फर्निचर घोटाळा उघड केल्यानंतर संबंधित टेंडर थांबवण्यात आले. तर तब्बल सहा हजार कोटींच्या घोटाळ्याबाबत कारवाई होण्यासाठी आता लोकायुक्तांकडे जाणार असल्याचे जाहीर करतानाच मिंधे फक्त टेंडर शोधत फिरत असतात असा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला. अवकाळी पावसामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा दौरा रद्द केल्याचे कारण दिले जात आहे. पण अवकाळी पावसामुळे दौरा रद्द केलेला नसून मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे काहीही पडलेले नसल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.
मंत्र्यांनी केवळ पाहणी दौऱ्यात बोटे दाखवून फोटो काढण्यासाठी जाऊ नये. सुट्टीसाठी जायचेच असेल तर जनतेच्या पैशाने नको तर स्वतःच्या पैशाने जावे आणि आपल्या कामाची जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवून जावे.
– आदित्य ठाकरे
ये डर जरूरी है
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जर्मनी-लंडन दौरा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घाना दौऱ्याबाबत प्रश्न उपस्थित करताच दोन्ही दौरे रद्द झाले. प्रत्येकाने असे प्रश्न नेहमीच उपस्थित करीत राहिले पाहिजे. ‘ये डर जरूरी है’ असा टोलाही त्यांनी लगावला. मंत्र्यांना बिनकामाची फॉरेन ट्रिप करायचीच असेल तर जनतेच्या पैशाने नको, तर स्वतःच्या पैशाने करा, असेही ते म्हणाले.
दाकोसला होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेची नेमकी कोणती पाहणी एका राज्याचे उद्योगमंत्री करणार आहेत.


























































