भाजप कबुतरखान्याच्या मुद्द्यावरून राजकीय फायद्यासाठी जैन समाजाच्या भावनांशी खेळत आहे का? आदित्य ठाकरेंनी घेतला खरपूस समाचार

भाजप फक्त त्यांच्या राजकीय फायद्यासाठी जैन समाजाच्या भावनांशी खेळत आहे का?, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. दादरमधील कबुतरखान्यावरील मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कारवाईवरून त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी X वर एका पोस्टद्वारे भाजपच्या काही नेत्यांच्या कृतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, “3 जुलै रोजी भाजपच्या एका विधान परिषद सदस्याने मुंबईतील कबुतरखान्ये पाडण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र आता भाजपचेच एक मंत्री ज्यांच्याकडे मुंबई महानगरपालिकेला (BMC) आदेश देण्याचा अधिकार आहे, त्यांनी याच कबुतरखान्यांच्या पाडकामाविरोधात बीएमसीला पत्र लिहिले आहे. विशेष म्हणजे हे मंत्री मंगलप्रभात लोढा, हे मुंबईचे पालकमंत्री देखील आहेत. हा तर निव्वळ विनोद आहे.”

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “स्थानिक रहिवाशांच्या भावनांचा, त्यांच्या इच्छेचा विचार केला गेला पाहिजे.” त्यांनी विलेपार्ले येथील जैन देरासरच्या उदाहरणाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “कायद्याचा पूर्ण आदर राखून, मी बीएमसीला कायदेशीर मार्ग शोधून पवित्र स्थळाचे पाडकाम टाळण्यास सांगितले होते. मात्र आता भाजपच्या सरकारच्या काळात बीएमसीने ते देरासर पाडले. त्यावेळी मंत्री लोढा यांनी याचा निषेध केला. मात्र प्रत्यक्षात बीएमसीला ते वाचवण्यासाठी कायदेशीर मार्ग शोधण्यास लोढा सांगू शकले असते.”

आदित्य ठाकरे म्हणाले की, “सत्य हे आहे की, जैन समुदायाला भाजप एक खात्रीशीर मतपेढी म्हणून पाहते, निवडणुकीदरम्यान अशा प्रकारे त्यांच्या भावनांशी खेळून मतदानावर काहीच परिणाम होणार नाही, याची भाजला खात्री आहे, म्हणून भाजप जैन समाजाकडे मतपेढी म्हणून बघते. त्यामुळे जैन समाजाने ही राजकीय खेळी ओळखली पाहिजे.”