गद्दारांना जनता सत्तेवरुन खाली खेचेल, याची खात्री आहे – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील गद्दार सरकारला देखील जनता सत्तेवरून खाली खेचेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

”कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या जी आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार जी यांनी आज शपथ घेतली, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! येणाऱ्या काळात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधले संबंध अधिक दृढ होतील, दोन्ही राज्यांची भरभराट होईल आणि सीमा भागातील मराठी माणसांना न्याय मिळेल, ही अपेक्षा! कर्नाटकातल्या 40 टक्के सरकारचा धुव्वा उडवून जनतेने या नवीन सरकारला निवडून आणले आहे. महाराष्ट्रातही लवकरच त्याची पुनरावृत्ती होऊन गद्दारांना जनता सत्तेवरुन खाली खेचेल, याची खात्री आहे.” असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

कर्नाटकमध्ये नवीन सरकार शनिवारी स्थापन झाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद्र गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटकचे एकमेव उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासह आठ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. बंगळुरुतील कांतीराव मैदानावर हा शपथविधीसोहळा झाला.

ऐक्याची ताकद

या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार अनिल देसाई, प्रियंका चतुर्वेदी, पीडीबीच्या मेहबुबा मुफ्ती, एम.के. स्टालिन, फारूख अब्दुल्ला, डी. राजा आणि सीताराम येचुरी, अभिनेते कमल हसन उपस्थित होते.