महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरणामुळे राज्याचा विकास थांबला नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोनशेपेक्षा अधिक वृक्ष कापायाचे असतील तर महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरणाकडे परवानगी मागण्याचा कायदा होता. महाविकास आघाडी सरकारने आणलेल्या या कायद्यामुळे राज्याचा विकास कुठेच थांबला नाही. कारण राज्याचा किंवा शहराचा विकास करताना समतोल राखला पाहिजे, शाश्वत विकास झाला पाहिजे हीच आमची या कायद्यामागील भूमिका होती, असे ठाम प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी आज विधानसभेत केले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा कायदा आणल्यानंतरही विकास थांबला नाही. कारण समृद्धी महामार्गाचे, मेट्रोच्या मार्गाचे काम थांबले नाही. कोस्टल रोड, शिवडी न्हावा- शेवा ट्रान्स हार्बर लिंकचे काम, कोणतेही काम थांबले नाही महाविकास आघाडी सरकार जाईपर्यंत या ‘एमटीएचएल’चे काम 82 टक्के पूर्ण झाले होते. नरीमन पॉइंट-कफ परेड कनेक्टरचे टेंडर निघाले आहेत. दहिसर-मीरा रोड रस्त्याचे टेंडर निघाले आहे. महाराष्ट्र वृक्ष प्राधिकरण समिती आल्यावर कुठे कामे थांबली, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

वेताळ टेकडीसाठी कायद्यात बदल?
पण कदाचित असे होत असेल की, या कायद्यामुळे नागपूरचे अजनी वन वाचले, पुण्यात रिव्हर फ्रंट डेव्हलमेंट थांबले, पुण्यातीलच वेताळ टेकडीचा प्रश्न आहे. वेताळ टेकडीसाठी हा कायदा बदलला जात आहे का, अशी शंका आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.