
भूमिपुत्रांना मुंबईबाहेर फेकून मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्याचा भाजप, मिंधे सरकारचा डाव आहे. मात्र विकासाच्या नावाखाली आम्ही कुणालाही धारावीबाहेर जाऊ देणार नाही. धारावी हे मुंबई रक्षणाच्या लढय़ाचा पेंद्रबिंदू आहे. धारावीकरांना धारावीतच 500 चौरस फुटांचे घर मिळाले पाहिजे अशी जोरदार मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज धारावीत केली. धारावी हे मुंबई रक्षणाच्या लढय़ाचे पेंद्रबिंदू आहे, असेही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी आज धारावी येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना धारावी बचावासाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन केले. धारावीत एकाही रहिवाशांना धारावीबाहेर जाऊ देणार नाही. आपला महापौर बसल्यावर एकही व्यक्ती धारावीबाहेर जाणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असे ते म्हणाले. भाजप-शिंदे गटाकडून तुम्हाला विविध प्रकारची आमिषे दाखवली जातील, मात्र धारावी वाचवायची असेल तर त्यांच्या आश्वासनांना बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. एकजूट मोडू देऊ नका. आम्ही तुम्हाला शब्द देतो की, शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी युतीची शिवशक्ती एकत्र आल्यामुळे मुंबईचे अदानीस्तान होऊ देणार नाही. या ठिकाणी राहणाऱया विविध धर्मियांची मंदिरे, समाजमंदिरे आदी आहेत तशीच राहिली पाहिजेत. अदानीची दादागिरी मोडून काढू आणि धारावीकरांना धारावीतच विकास करून देऊ, असे आश्वासही त्यांनी यावेळी बोलताना दिले.
धारावीकरांचा शिवसेना–मनसे–राष्ट्रवादी युतीलाच पाठिंबा
धारावीमधील प्रभाग क्र. 183 च्या शिवसेना–मनसे–राष्ट्रवादीच्या उमेदवार मनसेच्या पारूबाई कटके, प्रभाग क्र. 184 शिवसेनेच्या वर्षा नकाशे, प्रभाग 185च्या जगदीश मक्कुनी थैवलपिल, प्रभाग 186च्या अर्चना शिंदे, प्रभाग 187 च्या जोसेफ कोळी, प्रभाग 188 च्या मनसेच्या आरिफ शेख आणि प्रभाग 189च्या हर्षला मोरे या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत हजारो धारावीकरांनी आपला पाठिंबा शिवसेना–मनसे–राष्ट्रवादी युतीलाच असल्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शिवसेना नेते–खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, माजी आमदार बाबूराव माने आदी उपस्थित होते.





























































