प्रभादेवीत आज शिवसेनेचा झंझावात! आदित्य ठाकरे मेळाव्याला करणार मार्गदर्शन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पाय रोवून महा न्याय, महा निष्ठा देणारा शिवसेनेचा झंझावाती मेळावा शनिवार, 20 जानेवारीला प्रभादेवी येथे होणार आहे. नागूसयाजी वाडीतील दैनिक ‘सामना’ मार्गावर होणाऱ्या या मेळाव्याला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. विभाग क्रमांक 10 कडून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात मिंधे सरकारकडून सुरू असलेला सत्तेचा दुरुपयोग, जनतेची करण्यात येणारी दिशाभूल, पेंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग याविरोधात शिवसेनेकडून महाराष्ट्रात रान उठवण्यात येत आहे. याची सुरुवात जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात गिरगावमधून सुरू झाली असून उद्या प्रभादेवीत आदित्य ठाकरे यांची ही दुसरी सभा आहे. शिवसेनेचा झंझावात महाराष्ट्रभर सुरू राहणार आहे. यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख महेश सावंत, महिला संघटक श्रद्धा जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.