
गद्दार मिंधे सरकारने गेल्या एक वर्षात मुंबई महानगरपालिकेत केलेले घोटाळे मुंबईकरांसमोर आणतोच आहे; पण यापुढे ठाणे, कल्याण, पुणे महापालिकेतील घोटाळेही बाहेर काढणार आहे, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज दिला.
दादर येथील शिवसेना भवनात आदित्य ठाकरे यांनी आज युवासेनेच्या पदाधिकाऱयांची बैठक बोलवली होती. त्या बैठकीनंतर शिवसेना भवनाबाहेर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबई महानगरपालिकेत मिंधे सरकारने केलेल्या घोटाळ्याचा पर्दाफाश आम्ही करतच आहोत; पण यापुढे इतर महानगरपालिकांमधील घोटाळेही एकापाठोपाठ एक बाहेर काढू, असे आदित्य ठाकरे या वेळी म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा विराट मोर्चा 1 जुलै रोजी महापालिका मुख्यालयावर धडकणार आहे. गद्दारांचे घोटाळे मुंबईकरांच्या समोर आणण्यासाठी हा मोर्चा आहे, असे आदित्य ठाकरे या वेळी म्हणाले.
महाराष्ट्रात भीतीदायक वातावरण
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक भास्कर खुरसुंगे यांच्या पुतणीवर झालेल्या हल्ल्याबाबतही या वेळी माध्यमांनी आदित्य ठाकरे यांना विचारले. त्यावर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून महाराष्ट्रातील वातावरण भीतीदायक आणि चिंताजनक बनले आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. महाराष्ट्रात हुकूमशाही सुरू असून त्याविरोधात आवाज उठवणाऱयांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातात, असेही ते म्हणाले.
आधी गद्दार आमदारावर कारवाई करा
महापालिका अधिकाऱयाला मारहाण करणाऱयांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्याबद्दल बोलताना आदित्य ठाकरे यांनी, गृहमंत्र्यांनी आधी माहीममध्ये ज्या गद्दार आमदाराने गोळीबार केला त्याच्यावर कारवाई करावी आणि मग बोलावे, असा टोलादेखील लगावला.
मग रिअॅक्शन येणारच
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर कुणी हाथोडा चालवला तर त्यांच्या चाहत्यांकडून रिअॅक्शन येऊ शकते, असे आदित्य ठाकरे म्हणाले. अनधिकृत म्हणून जी शाखा महापालिकेने तोडली त्या शाखेत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांचा फोटो होता. राज्यात कुठेही शिवाजी महाराजांच्या किंवा बाळासाहेबांच्या फोटोवर कोणी हातोडा चालवला तर प्रतिक्रिया निश्चितच उमटू शकते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.




























































