
धारावीकरांचा विकास हा धारावीकरांच्या सहभागानेच झाला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यासंदर्भात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्या धारावीच्या कुंभारवाड्यातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
धारावीसाठीचा लढा हा मुंबईचा लढा आहे. धारावीतील रहिवाशांना तिथेच घर मिळाले पाहिजे असा शिवसेनेचा आग्रह आहे. कुंभारवाडा ही धारावीतील महत्त्वाची वस्ती आहे. तेथील रहिवासी पिढय़ानपिढय़ा तिथे मातीच्या वस्तू घडवण्याचे काम करतात. धारावीच्या पुनर्विकासात त्यांच्या व्यवसायाला धक्का लागता कामा नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे. त्याचसंदर्भात आदित्य ठाकरे उद्या सायंकाळी साडेचार वाजता रहिवाशांशी संवाद साधतील.