
तालुका परिसरात गुरुवारी (दि.14) रात्री एका हत्तीने चक्क ‘छोटा हत्ती’ म्हणजे टाटा एस टेम्पो उलटवल्याची घटना घडली आहे. आजरा-आंबोली मार्गावरील गवसे नजीकच्या तुलसी धाब्याजवळ रोमेथ फर्नांडिस यांच्या घरानजीक ही घटना घडली. यामध्ये फर्नांडिस यांच्या वाहनांचे शेड उद्ध्वस्त करण्यासह त्यातील इतर काही वाहनांचेही नुकसान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकारामुळे आजरा तालुक्यातील या परिसरात सतत घोंघावत असणारे हत्ती नुकसान संकट टळण्याची चिन्हे धूसर होऊ लागल्याचे अधोरेखित झाले आहे. दिवसेंदिवस अशा प्रकारच्या हत्ती नुकसानीच्या घटना घडत असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ हतबल झाले असून, हत्तीची दहशतही वाढू लागली आहे.
गेले काही दिवस जंगलानजीकचा परिसर आणि शेती-शिवारात धुडगूस घालणारा हत्ती आंबोली मार्गावर सहजरीत्या वावरत आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा महाकाय हत्ती येथील मार्गालगतच्या तुलसी धाब्याजवळच्या श्री फर्नांडिस यांच्या घराच्या कंपाउंडमध्ये शिरला. रात्रीची वेळ असल्याने त्याबाबत कोणास मागमूस लागला नाही. पण, दरम्यानच्या कालावधीत त्याने कंपाउंडमधील वाहनांचे शेड पाडून टाकले. या शेडमध्ये लावलेला ‘छोटा हत्ती’ हे वाहन धडकेने पलटी केले. त्यामुळे जंगली हत्तीनेच शेडमधील एका ‘छोटा हत्ती’ उलटवल्याची चर्चा येथे दिवसभर रंगली आहे. याबरोबरच धाब्यानजीक असलेल्या फर्नांडिस यांच्या घराच्या कंपाउंडमधील अन्य दोन दुचाकी वाहनांचेही त्याने नुकसान केले.
गेले अनेक दिवस हत्तीचा या परिसरातील वावर नित्याचा आणि धोक्याचा बनला आहे. वेळवट्टी ते गवसे दरम्यान हत्ती वावरत आहे. यामुळे पर्यटनासाठी ये-जा करणाऱ्या पर्यटकांच्या जीविताचा आणि वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रकारामुळे या मार्गावरील वेळवट्टी ते गवसे-सुळेरान पट्टय़ात दहशत पसरली आहे. त्यामुळे वन विभागाने याबाबत उपाययोजना करावी; अन्यथा हत्ती संगोपन केंद्र त्वरित स्थापन करावे, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.




























































