
संत ज्ञानेश्वर महाराज यांचे 726 व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यातंर्गत आळंदी कार्तिकी वारीची सांगता श्रींचे पालखी छबिना मिरवणुकीने हरिनाम गजरात झाली. सोहळ्याच्या सांगता दिनी श्रींचे पहाट पूजेत पवमान अभिषेक व दुधारती नंतर भाविकांचे महापूजा व दर्शनास श्रींचा गाभारा खुला करण्यात आला. दुपारी परंपरेने नैवेद्यास श्रींचे दर्शन बंद ठेवण्यात आले.महानैवेद्यानंतर पून्हा भाविकांना संजीवन समाधी दर्शनास गाभारा खुला करण्यात आला.
संतोष महाराज मोझे यांच्यावतीने मंडपात ह.भ.प.नारायण महाराज जाधव यांची मंत्रमुग्ध करणारी कीर्तन सेवा झाली.परंपरेने माऊलींचे पालखीची नगरप्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. मानकरी, फडकरी यांना नारळ प्रसाद व समाधी दर्शन होवून यात्रेची सांगता झाली. माउली मंदिरात माऊली करंजीकर यांचे दही हंडी काल्याचे कीर्तन सेवा झाली.
श्रींच्या पालखीचे दर्शनास भाविकांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली. भाविकांची दर्शनबारी भक्ती सोपान पुलावर दुपारपर्यंत होती. त्यानंतर मात्र दर्शनबारी मंडपात कायम राहिली. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना सुलभ दर्शनाचे व्यवस्थेचे नियोजन करण्यात आल्याचे व्यवस्थापक माउली वीर यांनी सांगितले. या मुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले. धूपार्तीनंतर श्रींचा छबिना पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक हरिनाम गजरात निघाला .रात्री उशिरा श्रींची छबिना मिरवणूक हरिनाम गजरात मंदिरात प्रवेश केला. श्रींची पालखी मंदिरात आल्यानंतर सोहळ्याचे मानकरी, पदाधिकारी यांना नारळ प्रसाद वाटप देवस्थान तर्फे होते. शेजारतीने सोहळ्याची सांगता रात्री उशिरा झाली.
सोहळा यशस्वी करण्यास आळंदी देवस्थांनचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई,आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव,आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जी,जी,जाधव,वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, वीज वितरण चे अभियंता सुभाष धापसे यांनी विशेष परिश्रम घेतले. खेडचे उपविभागीय अधिकारी प्रांत विक्रांत चव्हाण यांचे मार्गदर्शनात आळंदी कार्तिकी यात्रेचे प्रभावी नियोजन करण्यात आल्याने यात्रा सुरळीत पार पडली. यासाठी तहसिलदार वैशाली वाघमारे, मंडलधिकारी स्मिता जोशी यांनी कामकाज पाहिले. यात्रा काळात शांतता, सुव्यवस्था यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिस बंदोबस्त तैनात केला. यासाठी विशेष सहकार्य आळंदी पोलिस त्यांचे वतीने करण्यात आले. स्वकाम सेवा मंडळाच्या वतीने अध्यक्ष सुनील तापकिर यांचे मार्गदशनात मंदिर परिसरात स्वच्छता विषयक कामकाज करण्यात आले. आळंदी नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान राबवित स्वच्छता जनजागृती मोहीम राबविली. यात आलेल्या वारकरी भाविकांचा तुळशीरोप भेट देवून सत्कार करण्यात आल्याचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.
माउली देवस्थानच्या वतीने कार्तिकी यात्रा काळात दर्शनबारीचे रांगेतील भाविकांना मोफत खिचडी प्रसाद वाटप सेवा यावर्षी बंद राहिली. श्री पांडुरंगराय, श्री नामदेवराय व श्री पुंडलिकराय पादुका पालखी सोहळ्याचे श्री क्षेत्र आळंदी येथून प्रथा परंपरांचे पालन करीत हरिनाम गजरात पंढरीकडे सोहळे मार्गस्थ झाले. कैवल्य साम्राज्य ज्ञानचक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरहून श्री पांडुरंगराय, श्री नामदेवराय व श्री भक्त पुंडलिकराय पादुका पालखी भाविक, भक्तांसह सोहळे आळंदीत आले होते.




























































