
सामना प्रतिनिधी । नगर
आम आदमी पार्टी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देणार आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी निवडणूक लढवली होती. सय्यद यंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होत्या. त्यासाठी दोन महिन्यांपासूनच त्या नगर दक्षिणेतील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी पाठपुरावा करत होत्या. त्यांची राज्य शासनाच्या चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक पर्यटन मंडळाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्या या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीकडून अभिनेत्री सय्यद इच्छुक होत्या. यापूर्वी निवडणुकीत देखील रिंगणात होत्या. पाच वर्षांत मतदारसंघात त्या आश्रमाच्या कामाव्यतिरिक्त अन्य राजकीय घडामोडीत सक्रिय सहभागी नव्हत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच त्यांनी नगर तालुक्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी पाठपुरावा केला होता. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन देखील दिले होते. त्यानंतर त्यांची निवड राज्य शासनाच्या चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक पर्यटन मंडळाच्या संचालकपदी झाली होती. त्यामुळे त्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून नव्या उमेदवाराच्या शोधात पक्ष आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपची बैठक नगरमध्ये झाली. बैठकीसाठी जावेद काझी, तन्वीर बागवान, राजेंद्र कर्डिले, भरत खताळ, संपत मोरे, संदीप कनोजिया, शकिलभाई, प्रकाश फराटे, सुशील शेळके उपस्थित होते. या मतदारसंघातून आपकडून जावेद काझी, माजी कमल सावंत, निलेश शेलार इच्छुक आहेत.




























































