
आमलकी एकादशीचे निमित्ताने दोन लाखाहून अधिक वारकरी भाविकांनी पंढरपूर मध्ये गर्दी केली होती. श्री विठ्ठल मंदिरातील विठ्ठलाच्या गर्भगृहातील ग्रॅनाईट काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन बंद करुन केवळ 5 तास मुख दर्शन सुरु ठेवण्यात आले आहे. भाविकांनी नाराजी व्यक्त न करता मंदिराचे कळस आणि संत नामदेव पायरीचे दर्शन घेवून आपली वारी पोहचती केली.
चंद्रभागेत उजनी धरणातून पाणी सोडल्याने पात्र दुथडी भरून वहात आहे. या वाहत्या पाण्यात यथेच्छ स्नान करुन भाविकांनी नगर प्रदक्षिणा पूर्ण केली. राज्यभरातून आलेल्या दोन लाखाहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याने श्री विठ्ठल मंदिर परिसर भाविकांनी गजबजून गेल्याचे चित्र दिसून येत होते. मंदिराजवळ एलइडी स्क्रीनवर श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामुळे आलेले भाविक दर्शन घेण्यासाठी एलइडी स्क्रीनजवळ गर्दी करीत होते.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, भक्तिमार्ग भाविकांनी फुलून गेला होता. राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने आल्याने त्यांच्या वाहनांनी शहरातील वाहनतळ हाऊसफुल्ल झाले असल्याचे चित्र दिसून येत होते. भाविक दर्शनानंतर प्रासादिक साहित्य खरेदीसाठी गर्दी करत होते. यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धनाचे व विकासाचे काम 15 मार्चपासून सुरु करण्यात आलेले आहे. हे काम दिड महिन्यात पुर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांसाठी पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले आहे. तर केवळ मुख दर्शनाची सुविधा करण्यात आलेली आहे. तर राज्यभरातून आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये. म्हणून विठ्ठल मुर्तीजवळ कॅमेरा बसवून मंदिराबाहेर एलइडी स्क्रीनवर लाईव्ह दर्शन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगीतले.




























































