
अलिबाग फिरण्यासाठी आलेल्या तीन पर्यटक तरुणींच्या रिक्षाला म्हसळा तालुक्यातील आंबेत घाटामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुणी किरकोळ तर दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातग्रस्त विदेशी तरुणींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत. या तिनही तरुणी ऑस्ट्रेलियाच्या आहेत.
बुधवारी सकाळी या तरुणींच्या रिक्षाला आंबेत घाटामध्ये उताराचा अंदाज न आल्याने अपघात झाला. फिरण्यासाठी आलेल्या तीन तरुणींपैकी एक तरुणी रिक्षा चालवत होती. या अपघातामध्ये विदेशी तरुणींनी आणलेली रिक्षा पलटी झाल्याने त्यामध्ये असणार्या दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या असून एकीला किरकोळ मार लागला आहे. आंबेत येथील सामाजिक कार्यकर्ते नाविद अंतुले यांच्या तत्परतेमुळे या तरुणींना प्रथम घटनास्थळीच डॉ.स्वीटी यांना प्राचारण करून प्राथमिक उपचार करण्यात आला. यानंतर अंतुले यांनी या तरुणींना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी भरती केले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.गवळी यांना अपघाताची माहिती मिळताच व अपघातात जखमी झालेल्या तरुणी विदेशी पर्यटक असल्याने त्यांनी माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना त्वरित इलाज करण्याच्या सूचना केल्या. सदर अपघाताची नोंद गोरेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पो.ह.गणेश पवार हे करीत आहेत.


























































