
पंजाबमध्ये पुन्हा एकदा ‘ऑपरेशन लोटस’च्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. आम आदमी पक्षाचे (आप) नेते अनुराग ढांडा यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत कडाडून टीका केली आहे. हरियाणाच्या जनतेचा पैसा पंजाबमध्ये आमदारांची खरेदी-विक्री करण्यासाठी आणि लोकशाही अस्थिर करण्यासाठी वापरला जात असल्याचा खळबळजनक दावा ढांडा यांनी केला आहे.
अनुराग ढांडा यांनी चंदीगड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “पंजाबमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ कधीही यशस्वी होणार नाही. हरियाणा सरकारकडे जर इतका पैसा आणि ऊर्जा असेल, तर त्यांनी ती स्वतःच्या राज्यातील व्यवस्था सुधारण्यासाठी खर्च करावी. जनतेच्या टॅक्सचा पैसा दुसऱ्या राज्यातील आमदार फोडण्यासाठी वापरणे हे अत्यंत लाजीरवाणे आहे.”
हरियाणातील सद्यस्थितीवर बोट ठेवत ढांडा यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले. हरियाणात आज बेरोजगारी, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, खराब रस्ते आणि नशेचे वाढते जाळे यांसारख्या गंभीर समस्या आहेत. गेल्या नऊ महिन्यांपासून खेळाडूंना त्यांच्या आहाराचे पैसे मिळालेले नाहीत, वृद्धांची पेन्शन कापली जात आहे आणि महिलांच्या योजनांमध्ये कपात केली जात आहे. तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना मुख्यमंत्री सैनी यांचे प्राधान्य पंजाबमधील षडयंत्रांना का आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

























































