पंतप्रधान मोदींविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी ही याचिका दाखल केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर संसदेत अनुपस्थित राहिल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे. सिंह यांनी न्यायालयाला संसदेतील उपस्थितीबाबत कार्यमर्यादा ठरवण्याची मागणी केली आहे. कपिल मिश्रा यांच्या ट्विटला प्रत्युतर देताना सिंह यांनी हे ट्वीट केले आहे.

आप खासदार संजय सिंह यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘विरोधकांच्या मागणीनंतरही पंतप्रधान मोदी संसदेमध्ये हजर राहात नाहीत. दिल्लीतील मोहल्ला क्लिनीकपासून ते विविध योजनांवर मोदी बंदी आणत आहेत. परंतु कपिल मिश्रा त्यांच्याविरोधात एकदाही आवाज उठवला नाही. यामागे काय कारण आहे?’

कपिल मिश्रांचे ट्वीट आणि प्रत्युत्तर
कपिल मिश्रा यांनी एक ट्वीट करत दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या विधानसभेतील गैरहजेरीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. ‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेत असायला हवे. आमदारांना विधानसभेत ७५ टक्के हजेरी आवश्यक आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी हजेरी असणाऱ्या मुख्यमंत्री, मंत्री किंवा आमदारांचा पगार कापायला हवा’, असे ट्वीट मिश्रा यांनी केले होते. मिश्रा यांनी केजरीवाल यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मोदींच्या विदेश यात्रेवर निशाणा
सिंह यांनी मोदींच्या विदेश यात्रांना निशाणा साधणारे ट्वीट केले आहे. ‘देशाच्या पंतप्रधानांना संसदेत सातत्याने उपस्थित राहात चांगला आदर्श ठेवला हवा. परंतु मोदी संसदेत गैरहजर राहतात आणि विदेशात फिरतात हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे.’ तसेच, मोदी संसदीय सत्रादरम्यान विदेशातील यात्रांमध्ये व्यस्त असतात. संसदेतील कोणत्याही गंभीर विषयाला उत्तर देत नाहीत. संसद परिसरात असतानाही मोदी संसदेत पाऊल ठेवत नाही. हा संसदेचा आणि खासदारांचा अपमान नाही तर काय आहे,’ असा प्रश्न सिंह यांनी ट्वीटद्वारे उपस्थित केला आहे.