
अभय मिरजकर
दसऱयाच्या दिवशी आपटय़ाचे पान सोने म्हणून दिले जाते, पण मागील काही वर्षांपासून चक्क अंजनाची पाने दिली जातात. अनेकांना आपटा आणि कांचन यांचा फरक समजत नाही. देशातील आयुर्वेदिक औषधी वृक्ष म्हणून कांचनची ओळख आहे. पिवळा कांचन, कांचन, रक्तकांचन आणि सफेद कांचन असे याचे काही प्रकार आहेत. कांचन हे झाड मध्यम आकाराचे असून त्याची साल गडद तपकिरी रंगाची व काहीशी गुळगुळीत असते. त्याचे नवे अंकुर तपकिरी रंगाच्या कोवळ्या लवीने झाकलेले असतात. कांचनाची पानगळ थंडीच्या मोसमात होते. ही पाने कोवळी असताना त्यावर बारीक लव असते, परंतु ही पाने जसजशी मोठी होतात तसतशी ही लव नाहीशी होते. पानांचा पृष्ठभाग चामडय़ासारखा होतो. या झाडाची फुले वेगवेगळ्या रंगाची असतात. गुलाबी, पांढरी, फिकट जांभळ्या रंगावर गडद जांभळ्या छटा असलेली आणि सुवासिक असतात. ही फुले फारच आकर्षक व मनमोहक दिसतात. कांचन या वृक्षाच्या फुलांचा मोसम हा डिसेंबर ते मार्च किंवा एप्रिलमध्ये असतो. हिंदुस्थानच्या पूर्वेस आसाम, मानण्यावर, मध्य प्रदेश येथे भरपूर आढळतात. उंच व पाण्याचा निचरा होणाऱया मातीत ही झाडे लवकर रुजतात व बहरतात. या झाडाच्या तोडलेल्या फांद्याही मातीत लावल्यास त्या रुजतात. या झाडाची फुले सुवासिक असल्यामुळे मधमाश्या त्याकडे आकर्षित होतात व त्या माध्यमातून परागण होते.
कांचनाची पाने ही आपटय़ाच्या पानासारखी आहेत. आपटय़ाचे पान लहान असते, तर कांचनचे पान मोठे असते. त्यामुळे आता सर्रासपणे दसऱयाला हे झाड तोडून याची पाने आपटय़ाचे पान म्हणून विकले जाते. पिवळा कांचन चार मीटरपर्यंत वाढतो. कांचन 10-12 मीटर उंच वाढतो. पाने साधी, 10-20 सेंमी लांब व रुंद असून आपटय़ाच्या पानांसारखी दोन भागांत विभागलेली असतात. फुले मोठी व सुवासिक असून फांदीच्या टोकाला झुबक्यात येतात. ती गडद गुलाबी किंवा पांढरी असतात.
रक्तकांचन याला देवकांचनही म्हटले जाते. हा वृक्ष 9 मीटर उंचीपर्यंत वाढतो. शोभेसाठी हा वृक्ष लावला जातो. पांढऱया कांचनची पाने साधी व दोन भागांत विभागलेली असून ती जनावरांच्या खुरांप्रमाणे दिसतात. पिवळय़ा कांचन वृक्षाचे लाकूड कठीण व चिवट असते. हत्यारांच्या मुठी बनविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. खोडाच्या सालीतील धाग्यांपासून दोर तयार करतात. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व प्रतिऑक्सिडंट म्हणून त्याच्या खोडापासून व पानांपासून काढलेल्या अर्काचा वापर करतात. कांचनचे लाकूड मजबूत व हलके असून साध्या घरबांधणीत व शेतीच्या अवजारांकरिता वापरतात. साल कातडी कमावण्यास व रंगविण्यास आणि पाला गुरांना खाऊ घालण्यासाठी उपयुक्त आहे.
फुलांची भाजी किंवा लोणचे करतात. सालीपासून धागा व गोंद मिळतो. संस्कृत वाङ्मयात ‘कोविदार’ या नावाने या वृक्षाचा उल्लेख आढळतो. पाने विडय़ा बांधण्यास वापरतात. पाला सफेद कचनारप्रमाणे उपयुक्त. कळय़ा, पाने व कोवळय़ा शिंबा भजीकरिता वापरतात. फुले साखरेबरोबर सारक म्हणून घेतात. सालीपासून गोंद व पिंगट रंग मिळतो. लाकूड कठीण, जड व लालसर पिंगट असून शेतीची अवजारे व जळण यांकरिता वापरतात. औषधात जास्त करून लाल आणि सफेद कांचन वापरले जातात. खोकला, मुळव्याध, रक्तशुद्धी, तोंड येणे, मासिक धर्म, पोटातील किडे, बद्धकोष्ठता, जखमेवर, पोटातील गॅस आणि इतर काही रोगांत लाल कांचन वापरतात. पांढरा कांचन मूत्ररोग, मूळव्याध, त्वचारोग, जुलाब आणि इतर काही रोगांत सफेद कांचन वापरतात.





























































