
बृहन्मुंबई दूध योजनेंतर्गत विक्री करण्यात येणाऱया आरे शक्ती गाय दूध, टोन्ड दूध, म्हैस फुल क्रीम दुधाच्या प्रतिलिटर विक्री दरामध्ये एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. 16 ऑक्टोबरपासून वाढिव दर लागू होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
आरे शक्ती गाय दुधाचा प्रति लिटरचा सध्याचा दर 41 रुपये आहे, त्यामध्ये एक रुपयांची वाढ झाली असून यापुढे 42 रुपये मोजावे लागणार आहेत. तर अर्धा लिटर दुधासाठी 21 ऐवजी आता 22 रुपये मोजावे लागणार आहेत. गाय टोन्ड दुधाचा प्रति लिटरचा दर 37 करून 38 रुपये झाला आहे. फुल क्रीम दुधाचा सध्याचा प्रति लिटरचा दर 46 रुपये आहे, त्यामध्येही एक रुपयांची वाढ होऊन 47 रुपये झाला आहे.
वितरकांचे कमिशन 50 पैशांनी काढले
राज्य सरकारने दुधाच्या विक्री दरात वाढ करतानाच वितरकांच्या कमिशनमध्येही वाढ केली आहे. आरे शक्ती गाय दुधासाठी प्रति लिटरला 3.50 रुपये एवढे वितरण कमिशन दिले जात होते, ते आता चार रुपये केले आहे. तर गाय टोन्ड दूध व फुल क्रीम दुधाचे वितरण कमिशन 3 रुपयांवरून साडेतीन रूपये केले आहे. रुग्णालये, संस्था व ठोक यांच्याकरीता स्थळ पोहच आकार प्रती लिटरला 50 पैसे होता, तो आता 75 पैसे केला आहे.





















































