आसामला पुराचा तडाखा, 54 लाख जणांना बसला फटका; 81 जण मृत्युमुखी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीमुळे आसामला पुराचा फटका बसला आहे. येथील एकूण 30 जिह्यांमधील 54 लाख नागरिकांना त्याचा फटका बसला असून आतापर्यंत 81 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना सांगितले. तर मोदी यांनी आपल्याशी फोनवरून चर्चा केली असून त्यांना राज्याची सर्व परिस्थिती सांगितली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आज ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले.

आसाममध्ये पुरामुळे मोठी हानी झाल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत 81 जणांचा मृत्यू झाला असून भूस्खलनामुळे 26 जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे यावर्षी मृत पावलेल्यांची संख्या आता 107 वर पोहचली आहे. या पुराचा फटका 30 जिह्यांना बसला असून 167 पूल, 1600 पेक्षा अधिक रस्त्यांचे पुरांमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, पूरग्रस्तांना मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी केले आहे.

पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन
आसाममधील परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील विविध विषयांची माहिती घेतल्याचे मुख्यमंत्री सोनोवाल यांनी ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले. मोदींनी आसाममधील पूरस्थिती, कोरोना संकट आणि बघजन तेलविहिरीतील आगीबद्दल विचारपूस केल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तर राज्याला आवश्यक ती सर्व मदत देण्यात येईल, असे आश्वासन मोदींनी यावेळी दिल्याचे त्यांनी जाहीर केले.