अजितदादांना सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील! आशीष शेलार यांचे विधान

आम्ही आणि आमचा पक्ष सावरकरांच्या विचारांवर चालणारा आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. तुम्ही याल तर तुमच्याबरोबर आणि नाही आलात तर तुमच्याशिवाय, असा सूचक इशारा भाजप नेते मंत्री आशीष शेलार यांनी अजितदादा गटाला आज दिला.

अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचारावरून टीका केली होती. या टीकेनंतर भाजपाच्या नेत्यांनी अजितदादांना घेरण्यास सुरुवात केली आहे. आशीष शेलार म्हणाले, आम्ही सावरकरांचे भक्त आहोत, असे सांगत अजित पवार गटाला डिवचले. आम्ही सावरकरांच्या विचारांवर चालणारे आहोत. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षालादेखील सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील. आमचे विचार असे आहेत की, तुम्ही याल तर आम्ही तुमच्याबरोबर, नाही आलात तर तुमच्याशिवाय. विरोधात गेलात तर तुमच्या विरोधात. आम्ही आम काम करू, असा इशारा शेलार यांनी दिला.

आंबेडकरी विचारधारा तुम्हाला स्वीकारावीच लागते हे सत्य – मिटरी

दादा व दादांचा पक्ष तुमच्या ‘आदर्शांच्या’ नेतृत्वावरच चालला पाहिजे हा जो तुमचा अट्टहास आहे व हे जे तुम्ही ठासून सांगत आहात त्यात किती तथ्य आहे हे तुम्हालाच माहीत. तूर्तास इतकेच सांगेन, आम्ही ‘शिव, शाहू, फुले, आंबेडकरी’ चळवळीशी बांधील व प्रामाणिक होतो, आहोत आणि राहू. तुम्हाला अपेक्षित विचारधारा आम्ही जरी स्वीकारत नसलो तरी आमच्या पक्षाची आंबेडकरी विचारधारा तुम्हाला नाइलाजाने का होईना स्वीकारावीच लागते हे त्रिवार सत्य आहे,’’ असे प्रत्त्युत्तर अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी शेलार यांना दिले.