
महाराष्ट्र आणि देशालाच नव्हे तर जगाला योग आणि आयुर्वेदाचे महत्त्व पटवून देणारे आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे आज पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. गेल्या आठवडय़ात प्रकृती खालावल्याने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. तांबे यांच्या पश्चात पत्नी वीणा, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
डॉ. बालाजी तांबे यांनी योग, आयुर्वेद आणि संगीताद्वारे आयुष्य आरोग्यदायी बनवता येऊ शकते हे सिद्ध करून दाखवले. त्यांना संगीतोपचारातील तज्ञ म्हणून ओळखले जात होते.
गेली पाच दशके त्यांनी आयुर्वेदाचा जगभरात प्रसार केला. व्याख्याने, पुस्तके, सीडी अशा विविध माध्यमांद्वारे त्यांनी आयुर्वेद घरोघरी पोहोचवले. राजकारण, समाजकारण, उद्योग जगत, सिनेसृष्टी अशा सर्वच क्षेत्रांमध्ये डॉ. तांबे यांचा मित्रपरिवार होता. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता. डॉ. तांबे यांच्या उपचारपद्धतीचा सर्वत्र आदर केला जात होता.
डॉ. बालाजी तांबे यांना बालपणीच वडिलांकडून आयुर्वेदाची शिकवण मिळाली होती. त्यांनी इंजिनीयरिंगचे शिक्षणही घेतले होते. आयुर्वेद आणि इंजिनीयरिंगमधील पदवी त्यांनी एकाच वर्षी मिळवली होती. आपल्या ज्ञानाचा समाजाच्या प्रत्येक वर्गाला फायदा व्हावा यासाठी त्यांनी पुणे जिह्यातील कार्ला येथे आत्मसंतुलन व्हिलेजची स्थापना केली. आपल्या ओघवत्या वक्तृत्व शैलीतून त्यांनी आयुर्वेदाची महती जगभरात पोहोचवली.
संशोधक आणि लेखक
आयुर्वेदावर डॉ. बालाजी तांबे यांची अनेक पुस्तके आहेत. त्यांच्या गर्भसंस्कार या विषयावरील पुस्तकांना तर आजही मोठी मागणी आहे. मराठी, इंग्रजीसह सहा भाषांमध्ये त्या पुस्तकांचे भाषांतर झाले आहे. आयुर्वेदाद्वारे निरोगी आरोग्याचा पर्यायाने जीवनाचा मंत्र देणारे डॉ. तांबे यांनी अध्यात्मालाही तितकेच महत्त्व दिले. श्री गीता योग – शोध ब्रम्हविद्येचा, श्री रामविश्वपंचायतन, संतुलन क्रियायोग, आत्मरामायण, चक्र सुदर्शन ही त्यांची अध्यात्मावरील पुस्तके प्रसिद्ध आहेत.
आयुर्वेद, योग शिक्षणातून पिढी घडवणारा आरोग्यपूजक, मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्त्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉ. बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. दर्जेदार औषध- निर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देश, विदेशातही प्रसार केला. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टिकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील.

























































