
>> अभय मिरजकर
मागील वर्षीच्या दिवाळी वेळी आकाश कंदील, पणती आणि उटण्याच्या विक्रीमधून जमलेल्या निधीतून ‘माझं घर’च्या भिंती बोलक्या झाल्या. सर्वांना सहजपणे शिक्षणाची व्यवस्था झाली. विशेष म्हणजे मुलांना स्वावलंबनाचे धडेपण मिळाले.
औसा तालुक्यातील मौजे बुधोडा वांगजेवाडी येथे माणूस प्रतिष्ठान संचलित ‘माझं घर’ हा उपक्रम राबविण्यात येतो. समाजातील शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण होऊन त्यांना सुलभ पद्धतीने शिक्षण घेता यावे यासाठी संचालक शरद झरे व संगीता झरे पुढाकार घेत आहेत. इथे गांधीजींच्या नई तालीम संकल्पनेवर आधारित स्वावलंबनाचे धडे दिले जातात. एकल पालक, अनाथ, शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकांमधील मुलांचे संगोपन माझं घर या ठिकाणी केले जाते. केवळ पुस्तकी शिक्षण म्हणजे शिक्षण नाही तर चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षण कसे असले पाहिजे हे मुलांमध्ये बिंबवले जाते. या ठिकाणी असणारी मुले अगदी भाजी लावून ती तयार करण्यापर्यंतचे सर्व शिक्षण घेतात. स्वयंपाक करतात, विविध वस्तू बनवतात, शिवणकाम, बागकाम शिकतात. हे सर्व आवड, छंद म्हणून केले जाते. मागील वर्षी येथील मुलांनी स्वत तयार केलेले आकाश कंदील, उटणे, पणत्या विक्रीतून 2 लाख रुपये मिळवले होते.यातून प्रकल्पातील भिंतीवर रंगवलेली चित्रे व रेखाटलेल्या माहितीच्या माध्यमातून भिंती बोलक्या झाल्या आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणातील रुचीपण वाढत आहे.
सर्व भिंतींवर विविध विषयांवर आधारित चित्रे रेखाटली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास मदत झाली आहे. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपयुक्त असे पाठ भिंतीवर रंगवले आहेत. भिंतींकडे पाहून विद्यार्थी विद्यार्जनात रमून जातात. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून या आगळ्यावेगळ्या बोलक्या भिंती पाहण्यासाठी अनेक मान्यवर वारंवार भेटी देत आहेत.
जिह्यातील जिल्हा परिषद शाळांमधून अशा बोलक्या भिंती शासकीय पैश्यातून केल्या जातात; पण त्याची ना विद्यार्थ्यांना जिज्ञासा असते ना शिक्षकांना अप्रूप असते. निधी खर्च केला हे समाधान मुख्याध्यापक आणि समिती सदस्यांना असते. पण स्वकष्टार्जित पैश्यातून शिक्षण घेण्यासाठीची जाणीव आणि धडपड, स्वावलंबी होण्यासाठीचे शिक्षण ‘माझं घर’मधील मुले घेत आहेत.