ठसा – शिवराज पाटील चाकूरकर

>> अभय मिरजकर, [email protected]

ज्यांची ओळखच राजकारणातील संत नेतृत्व अशी होते, ते नेतृत्व म्हणजे लातूरचे सुपुत्र माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर. खरे तर ज्ञानाचे चालते बोलते विद्यापीठ असे म्हटले तरी ते  वावगे ठरू नये. विज्ञान असो की अध्यात्म, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घटना असो की भूपंप अथवा चक्रीवादळ, अणू, रेणू, परमाणू, हायड्रोजन असा विषय, प्रचंड वाचन आणि माहितीचा जणू विश्वकोश म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर होय. दासबोधाचे इंग्रजी भाषेत रूपांतरही त्यांनी केलेले.

लातूर जिह्यातील चाकूर या छोटय़ा गावात  12 ऑक्टोबर 1935 रोजी त्यांचा जन्म झाला. वकिलीचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी वकिली सुरू केली. नंतर राजकारणात प्रवेश केला. लातूर शहराचे नगराध्यक्ष म्हणून 1 ऑगस्ट 1966 ते 31 मार्च 1970 पर्यंत त्यांनी काम पाहिले. 1972 ते 1980 या कालावधीत आमदार म्हणून त्यांनी काम केले. महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून 5 जुलै 1977 ते 2 मार्च 1978 पर्यंत काम केले. नंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून 17 मार्च 1978 ते 6 डिसेंबर 1979 पर्यंत काम केले.1980 ते 2004 पर्यंत त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

या कार्यकाळात 1980 ते 1982 पर्यंत पेंद्रीय संरक्षण राज्यमंत्री म्हणून काम केले. पेंद्रीय वाणिज्य मंत्री म्हणून 1982 ते 1983 पर्यंत काम केले. पेंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री म्हणून 1983 ते 1984 पर्यंत काम केले. लोकसभेचे उपसभापती म्हणून 19 मार्च 1990 ते 13 मार्च 1991 पर्यंत काम केले आणि लोकसभा सभापती म्हणून 10 जुलै 1991 ते 22 मे 1996 पर्यंत केलेले काम दिशादर्शक ठरले. 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, परंतु पक्षाशी एकनिष्ठ आणि गांधी कुटुंबाशी जवळीक असल्याने थेट देशातील दुसऱया क्रमांकाचे पेंद्रीय गृहमंत्रीपद त्यांनी 22 मे 2004 ते 30 नोव्हेंबर 2008 या काळात भुषविले. त्यांचा पराभव झाला नसता तर ते पंतप्रधान झाले असते ही लातूरकरांना खंत राहिली. 5 जुलै 2004 ते 22 जानेवारी 2010 पर्यंत ते राज्यसभेत सदस्य म्हणून राहिले. 22 जानेवारी 2010 ते 21 जानेवारी 2015 पर्यंत त्यांनी पंजाबचे राज्यपाल म्हणून काम केले.

मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेवर असलेले प्रभुत्व व प्रभावी मांडणी हा शिवराज पाटील चाकूरकर यांच्या राजकीय प्रवासाचा विशेष गुण . स्वच्छ चारित्र्य, टापटीप राहणीमान, वेगवेगळ्या विषयांवरील सखोल अभ्यास, अध्यात्माचा व्यासंग कमालीचा होता. दासबोध, भगवद्गीता, वेदांत, संतसाहित्य यांचा त्यांना गाढा अभ्यास होता. अत्यंत शांत, संयमी , कोणी कितीही टीकाटिपणी केली तरी त्यावर विशेष भाष्य न करता शांतपणे आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणारे नेतृत्व म्हणजे शिवराज पाटील चाकूरकर. एखाद्या धर्मगुरूचा पण अभ्यास कमी पडावा असा त्यांचा व्यासंग होता. स्थानिक राजकारणात न पडता मी खासदार म्हणून आहे, रस्ते, लाईट, नाली, दवाखाने ही कामे माझी नाहीत. त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. कायदे करणे, धोरण ठरवणे हे माझे काम असल्याचे ते सांगत असत. 30 वर्षांपूर्वी ते आपणाला भविष्यात समुद्राचे खारे पाणी शुद्धीकरण करून प्यावे लागेल असे भाषणात सांगत असत. सर्वधर्मसमभाव मानणाया व त्यांची अंमलबजावणी आपल्या कृतीतून करणाऱया नेतृत्वाची पोकळी चाकूरकर यांच्या जाण्याने लातूर जिह्यात निर्माण झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. राजकारणात न केलेल्या कामाचेही श्रेय लाटण्याची स्पर्धा असते, परंतु शिवराज पाटील चाकूरकर यांनी नगराध्यक्षपदापासून ते गृहमंत्री पदापर्यंत काम केले. अनेक निर्णय घेण्यात आले, परंतु त्याचे वैयक्तिक श्रेय घेण्याचा प्रयत्नसुद्धा शिवराज पाटील चाकूरकर यांनी कधीच केला नाही.  12 डिसेंबर रोजी लातुरातील देवघर या निवासस्थानी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला व इहलोकीची यात्रा संपवली.